12 Pigeon pea purchasing centers Approve in Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे. ९ केंद्रावरून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली आहे.
हंगाम २०२४-२५ साठी तूर या पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दराने १३ फेब्रुवारी २०२५ पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून खालील ९ केंद्रावरून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. शेवगाव तालुक्यामध्ये सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी बोधेगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्ड पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी घारगाव, रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राहुरी, पारनेर तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पारनेर, कोपरगाव तालुक्यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कोपरगाव तर जामखेड तालुक्यात चैतन्य कानिफनाथ फळ प्र.सहकारी संस्था खर्डा उपबाजार समिती येथे नोंदणी करण्यात येईल.
पुण्यात इलॉन मस्कची एन्ट्री; टेस्ला कंपनीचा प्लांट उभारणार, राज्य सरकारशी चर्चा सुरु
सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्डची, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि तूर पिकाची नोंद असलेला ऑनलाईन पीकपेरा व चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करुन सुकवून माल केंद्रावर आणावा.
नाफेड/एनसीसीएफच्या स्पेसीफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल. देण्यात आलेल्या तारखेसच शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.