निलेश घायवाळ कनेक्शननंतर आता कौटुंबिक वाद…, सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट?

Sagar Moholkar Case :  अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. श्रीरामपूर, घोडेगाव अन् आता

Sagar Moholkar Case

Sagar Moholkar Case :  अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. श्रीरामपूर, घोडेगाव अन् आता जामखेडमध्ये झालेल्या गोळीबारामुळे जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी (4 मार्च) रात्री जामखेडमधील नुरानी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सात राऊंड फायरींग केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या गोळीबारात मोहोळकर (Sagar Moholkar Case) गंभीर जखमी झाला असून त्याला जामखेडमध्ये प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे. सध्या या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नुरानी कॉलनी जवळ दबा धरुन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पसार झाले. तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी केली.

निलेश घायवाळ कनेक्शन की कौटुंबीक वाद ?

पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवाळ (Nilesh Ghaywal) याच्या कानशिलात लावल्यानंतर गुन्हेगारी जगात सागर मोहळकर हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. मात्र याच घटनेनंतर तो अनेकांच्या निशाण्यावर होता असं देखील आता बोलले जात आहे. तर बुधवारी झालेला गोळीबार देखील याच कारणावरुन झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी सागर मोहोळकरच्या वडिलांनी सागर मोहोळकर आपल्याला मारहण करतो असा आरोप करत त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर आता गुंड निलेश घायवाळ आणि सागर मोहोळकरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीचा काही कनेक्शन आहे का? याचा देखील तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

कुख्यात गुंड सागर मोहळकरवर सात राऊंड फायर; चार गोळ्या अंगात, प्रकृती गंभीर

आरोपींचा शोध सुरू

बुधवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  सीसीटीव्हीच्या माध्यमातून या प्रकरणात असणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आहे. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

follow us