ADCC Bank Election : खासदार निलेश लंके हे बाजी मारणार की विखे धक्का देणार ? उद्या फैसला

ADCC Bank Election- 10 जागांसाठी 99.27% मतदान. खासदार निलेश लंके की विखे-थोरात सहकार पॅनल बाजी मारणार?

Adcc Bank

Adcc Bank

ADCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या (ADCC Bank Election) दहा जागांसाठी सोमवारी चुरशीची वातावरणात मतदान प्रक्रिया पारक पडली. या निवडणुकीत सरासरी 99.27 टक्के मतदान झाले. बँकेच्या 21 संचालक जागांपैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याl. उर्वरित 10 जागांसाठी 27 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात खासदार निलेश लंके व डॉ. सुजय विखे समर्थक राहुल शिंदे यांच्यात अटीतटीची लढत आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान पार पडले. तर मतदानाच्या टक्केवारीत कमी मतदान हे राहुरीत घडल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपचे नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे पारंपरिक राजकीय विरोधक सहकार पॅनलच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यांच्या युतीला खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या परिवर्तन पॅनलने आव्हान दिले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही स्वतंत्रपणे आपल्या समर्थकांच्या माध्यमातून निवडणुकीत ताकद लावली होती.

सुरुवातीला संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, जागावाटपातील तिढ्यामुळे 10 जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. बिनविरोध झालेल्या 11 जागांपैकी 10 जागा विखे-थोरात गटाकडे, तर एक जागा राम शिंदे गटाकडे गेली आहे. त्यामुळे उर्वरित जागांच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

संगमनेरमध्ये बाचाबाची आणि गोंधळ
सोमवारी मतदानादरम्यान संगमनेर येथे काही ठिकाणी बाचाबाची आणि गोंधळाचे प्रकार घडले. प्रताप ढाकणे यांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापले होते. मात्र, प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. तर संगमनेर येथील मतदान केंद्रामध्ये मतपत्रिकेची व्हिडिओ शूटिंग केल्याप्रकरणी संगमनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळी मतदान सुरू झाले तेव्हा पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी प्रमाणात नोंदवले गेली. मात्र, दुपारच्या सत्रात आणि शेवटच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केल्याने ऐनवेळी प्रशासनाचे देखील धावपळ पाहायला मिळाली तर चार वाजता मतदान प्रक्रिया थांबल्यानंतर देखील एकूण मतदानाची आकडेवारी समोर येण्यासाठी तब्बल तीन ते चार तासांचा कालावधी गेला. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक प्रशासनाकडून एकूण मतदाराची आकडेवारी समोर आली. त्यामध्ये 99.27 टक्के मतदान झाल्याचे समोर आले.

यावेळी दिवसभरात निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार नीलेश लंके, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हे, तनपुरे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सर्व मतपेट्या कडक पोलीस बंदोबस्तात नगर शहरातील कल्याण रस्त्यावरील अमरज्योत लॉन्स येथील मतमोजणी केंद्रावर जमा करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दुपारपर्यंत बँकेच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोणत्या तालुक्यात किती मतदान ?

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सरासरी 99.27 टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण 3837 पैकी 3809 मतदारांनी हक्क बजावला आहे. अकोले, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा व श्रीरामपूरमध्ये शंभर टक्के मतदान झाले. इतर तालुक्यांत कर्जत 99.40 टक्के, जामखेड 99.13 टक्के, पारनेर 99.12 टक्के, नगर 98.98 टक्के, राहाता 98.86 टक्के, कोपरगाव 98.30 टक्के, शेवगाव 98.29, राहुरीत 98.06 टक्के मतदान झाले आहे.

Exit mobile version