कोकणातलं अतिरिक्त पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवणार; नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्याला दिलासा देण्याचं नियोजन
Ulhas Godavari Project : कोकणात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा दुष्काळी भागांना फायदा देण्यासाठी मोठं नियोजन सुरू झालं आहे.
Ulhas Godavari Project : राज्यातील दुष्काळी भागांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने नदीजोड प्रकल्पांवर भर दिला आहे. कोकणात पावसाळ्यात समुद्राकडे वाहून जाणारं अतिरिक्त पाणी नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील जायकवाडी (Project ) धरणापर्यंत आणण्याचं नियोजन करण्यात येत आहे. गोदावरीचं खोरे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. धरणांमधील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवण्याचं धोरणही विभागाने हाती घेतलं आहे.
दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरणाच्या जलपूजन सोहळ्यात आणि प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या सर्वसाधारण सभेत विखे पाटील बोलत होते. स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत धरणाचं जलपूजन करण्यात आलं. या वेळी पाणी वापर संस्थांची भूमिका, उपलब्ध पाण्याचं काटेकोर नियोजन आणि धरणांमध्ये गाळ साचल्यामुळे कमी झालेली साठवण क्षमता यावर चर्चा झाली. पाण्याचा योग्य वापर आणि उपलब्ध जलसाठ्याचं व्यवस्थापन केल्यास दुष्काळी भागांना दिलासा देण्यास मदत होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य दिलं जात आहे. उल्हास-गोदावरी प्रकल्पासाठी तीन सर्वेक्षण पूर्ण झाली असून, त्यातून ९१ टक्के पाण्याची उपलब्धता होण्याची माहिती समोर आली आहे. पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी उचलून ते नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील जायकवाडीपर्यंत पोहोचवणं ही या योजनेतील प्राथमिकता असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे पुढील नियोजनाला आधार मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Water Grid : फडणवीसांचा वॉटर ग्रीड प्रकल्प दुष्काळ संपवणार अन् मराठवाडा सुजलाम सुफलाम करणार
राज्यातील सहा नदी खोऱ्यांचा अभ्यास करून एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या भागात पाण्याची उपलब्धता अधिक आहे, तिथला अतिरिक्त जलसाठा पाणीटंचाई असलेल्या प्रदेशात वळवण्याची तयारी सुरू आहे. नार-पार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, वैनगंगा-नळगंगा आणि कोकण-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचं नियोजन प्रगतीपथावर आहे. या योजनांमधून आठ जिल्ह्यांना पाणी उपलब्ध होण्यासोबतच १० लाख एकरांपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उल्हास आणि वैतरणा नदी खोऱ्यांतील अतिरिक्त पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवण्याचीही योजना आहे. उपलब्ध माहितीनुसार, पश्चिम वाहिनी उल्हास नदी खोऱ्यातून ३४.८० टीएमसी आणि वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी पाणी वळवण्याचं नियोजन आहे. एकूण पाणी वळवण्याचं प्रमाण ५४.७० टीएमसी ते ७० टीएमसीपर्यंत नेण्याचा विचार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, प्रत्यक्षात किती पाणी उपलब्ध होईल आणि किती वळवता येईल, यासाठी सर्वेक्षण व पुढील तांत्रिक प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या नदी खोऱ्यांतून ते धरणं, कालवे आणि बोगद्यांच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या भागात नेण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी झाल्यास नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील पाणी उपलब्धतेला मदत होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्याच्या धोरणामुळे उपलब्ध जलसाठ्याचा अधिक प्रभावी वापर करता येऊ शकतो. या योजनांचं नियोजन, सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढे कशी होते, यावर गोदावरी खोऱ्यातील पाणी व्यवस्थापनाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.