Download App

नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगरमध्ये मंदिरात ड्रेसकाेड; बर्मुडाधारी, हाफ पॅन्ट भाविकांना नाे एन्ट्री

  • Written By: Last Updated:

अहमदनगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना विशाल गणेश मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. याशिवाय विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरून देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

घनवट म्हणाले, ”देशातील अनेक मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू आहे. मंदिरात प्रवेश करताना अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय आणि तोकडे कपडे (बर्मुडा, हाफ पॅन्ट) घालून येऊ नये. नगरमधील १५ मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचे घाेषित करण्यात आले. पुढील दाेन महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येईल. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही.” माळीवाडा ट्रस्टचे अभय आगरकर, पंडित खरपुडे, अभिषेक भगत, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक रामेश्वर भुकन, मंदिर रक्षा समितीचे अरुण ठाणगे, मिलिंद चंवडके आदी उपस्थित हाेते.

 

ही आहेत ती मंदिरे

विशाल गणपती मंदिर (माळीवाडा), भवानी माता मंदिर (बुऱ्हाणनगर), शनी मारुती मंदिर (दिल्ली गेट), शनी मारुती मंदिर (माळीवाडा वेस), गणेश राधाकृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), विठ्ठल मंदिर (पाइपलाइन रस्ता), दत्त मंदिर (पाइपलाइन रस्ता), श्रीराम मंदिर (पवन नगर, सावेडी), भवानी माता मंदिर (सबजेल चौक), रेणुका माता मंदिर (केडगाव), श्रीराम मंदिर (वडगाव गुप्ता), पावन हनुमान मंदिर (वडगाव गुप्ता), संत बाबाजी बाबा मंदिर (वडगाव गुप्ता), साई बाबा मंदिर (केडगाव), खाकीदास बाबा मंदिर (नगर).

Tags

follow us