Download App

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा; नगर महापालिकेची धडक मोहीम

नगर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज सकाळपासूनच शहराच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

Ahilyanagar News : मोठं खेडं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. पाहता पाहता अतिक्रमणे जमीनदोस्त होऊ लागली आहेत. काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

नगर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज सकाळपासूनच शहराच्या अनेक भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महापालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.

सुपा एमआयडीसीतील अतिक्रमणावर बुलडोझर; लंकेंचे समर्थक विखेंवर तुटून पडले

शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणे मोकळे करून मगच मुख्य शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईचं नागरिकांकडून कौतुकही होत आहे. फक्त या कारवाईत सातत्य राहावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

यामागे कारणही आहे. अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर संबंधित अतिक्रमणधारक पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे करतात असा अनुभव आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या कारवाईचा उपयोग होत नाही. शहरात आज जी रहदारीची समस्या निर्माण झाली आहे. यामागे या अतिक्रमणांचा मोठा हात आहे. शहरातील रस्ते देखील कोंडले गेले आहेत. मुख्य बाजारपेठ असो की मुख्य रहदारीचे रस्ते सगळीकडेच अतिक्रमणांची समस्या गंभीर झाली आहे.

नागरिकांना या अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टींचा विचार करुनच पालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करून अतिक्रमणे काढून घेत आहे. आता ही मोहीम आणखी किती दिवस सुरू राहते, शहरातील रस्त्यांचा श्वास मोकळा होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर.. महापालिकेने दिला अल्टिमेटम

follow us