Download App

“..तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; पहिल्यांदाच आमदार झालेल्या भाजप नेत्याचं खुलं चॅलेंज!

निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.

Shrigonda News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीची पुरती धुळधाण उडाली. 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तर राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनीही ईव्हीएमवर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजपाचेच पराभूत उमेदवार राम शिंदे यांनीही ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. परंतु, कर्जतच्या शेजारील श्रीगोंदा मतदारसंघातील भाजपाचेच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मात्र ईव्हीएमवर शत प्रतिशत विश्वास व्यक्त केला आहे.

निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.

पाचपुते पुढे म्हणाले, वडील बबनराव पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात असायचो. त्यावेळी एकदा समोरच्या उमेदवारानं आक्षेप घेतला होता. यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि ईव्हीएमची मतं मोजली गेली होती. ही दोन्ही मते बरोबर निघाली होती. त्यात काहीच चूक नव्हती. या गोष्टी माहिती असताना देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत.

श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या; अनुराधा नागवडेंचं आवाहन, आढळगावात सभा

सुरुवातीला नोकिया कंपनीचे ब्लॅक अँड व्हाइट फोन यायचे. त्यावर तुम्ही फोटो वापरू शकत होता का? असा सवाल पाचपुते यांनी उपस्थित केला. जर आपण त्यात काहीच पाठवू शकत नसाल तर ईव्हीएममध्ये कसा बदल होऊ शकतो. ईव्हीएमला कनेक्टिव्हीटीला काहीच पर्याय नसतो असेही पाचपुते यांनी स्पष्ट केले.

आमच्या मतदारसंघात एकूण 345 ईव्हीएम मशीन होत्या आता या सगळ्याच मशीनमध्ये छेडछाड कशी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदान केंद्रावरही पोलिंग बूथ एजंटच्या सह्या असतात. आता फक्त आरोप करून लोकांची दिशाभूल केली जात आहे.

कर्जत जामखेडमधील भाजपाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी देखील पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे याबाबत विचारले असता पाचपुते म्हणाले, माझा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. या प्रक्रियेवर शंका उपस्थित झाली तर हा विक्रमसिंह पाचपुते हा पहिला आमदार असेल जो राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाईल असे भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले.

राहुल जगतापांचा रिमोट फडणवीसांकडे, संजय राऊतांचे टीकास्त्र, पाचपुतेंचाही घेतला समाचार

follow us