Download App

नगरच्या पुढाऱ्यांची गाडी अडकली आमदारकीवर…मंत्रिपदासाठी ‘वेट अँड वॉच’

Ahilyanagar News : राज्यात काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महाविकास आघाडीला धोबीपछाड देत महायुतीने घवघवीत यश मिळविले. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात बारा पैकी दहा जागांवर महायुतीने यश मिळवले. यामुळे महायुतीच्या या विजयात नगरचा देखील मोठा सहभाग राहिला. या यशानंतर जिल्ह्याला चांगले मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या जिल्ह्यात केवळ भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद वाटप होऊन बराच काळ ओलांडला आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना मंत्रिपदाची आस लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाहीररीत्या हे आमदार आता मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत आहेत. यामुळे नगरच्या पुढाऱ्यांची गाडी आमदारकीवरच अडकली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीला यश मिळाले अन महायुतीला मोठा फटका बसला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी चांगलीच कंबर कसली. नगर जिल्ह्यात देखील लोकसभेच्या दोन्ही जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले व महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीरामपूर व कर्जत-जामखेड वगळता महायुतीच्या उमेदवारांनी दहा जागांवर विजयाचा गुलाल उधळला. महायुतीच्या विजयात किंगमेकर ठरलेले आमदार राधाकृष्ण विखे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मात्र जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद दिले गेल्याने महायुतीचे आमदारांमध्ये काहीशी नाराजी पाहिला मिळाली.

मनसैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; पत्रात नेमकं काय?

जिल्ह्यातून महायुतीकडून अनेक आमदार तसेच त्यांचे कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याला मंत्रिपद मिळावे अशी जाहीर मागणी केली. विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधींनी थेट जाहीर राजकीय कार्यक्रमामध्ये देखील वरिष्ठ नेत्यांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. यातच नुकतेच नगर शहरामध्ये महायुतीच्या आमदारांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील महायुतीचे अनेक आमदार उपस्थित होते. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे व विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासमोरच लोकप्रतिनिधींनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तसेच जिल्ह्याचे विकासासाठी दोन मंत्रिपद असावेत असे देखील यावेळी काही लोकप्रतिनिधी बोलले.

मंत्रिपदासाठी महायुतीत इच्छुकांची गर्दी

जिल्ह्यात राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद देण्यात आले असून जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद आहे. मात्र मंत्रिपदासाठी महायुतीकडून अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी देखील आपली मंत्रिपदाबाबतची इच्छा जाहीर व्यक्त केली. तर त्याचबरोबर जिल्ह्यात केवळ एकच महिला आमदार असून लाडक्या बहिणीबाबत देखील विचार करण्यात यावा असे म्हणतच शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे या देखील या स्पर्धेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर यापूर्वी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती.

भाजपचं ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्था, सदस्य नोंदणी अन् जिल्हाध्यक्ष; अहिल्यानगरचा अध्यक्ष कोण?

माजी खासदारांनाही पुनर्वसनाची अपेक्षा…

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याची व आता माजी झाल्याची खदखद माजी खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी व्यक्त करून दाखवली. महायुतीच्या आमदारांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमध्ये बोलताना विखे म्हणाले या मंचावर सर्वच “आजी” आहेत मी एकटाच “माजी” आहे तर माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं, आणि माझं ही पुनर्वसन करावं असं म्हटलं होतं. यावर राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले की, ‘लवकरच आम्ही सुजय विखे यांना आजी करण्याचं काम करणार आहोत. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवणार आहोत. मात्र ते राज्यात येऊ नये अशी आमची इच्छा आहे. कारण ते राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल असेही कर्डिले म्हणाले होते.

follow us