Download App

थोरात, लंके जोडगोळी विखेंच्या रडारवर; राजकारण अन् झेडपी पालिका निवडणुकीचा वेध?

सुजय विखे यांचा लोकसभेत पराभव झाला. मात्र आता याच पराभवाचा बदल घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

Ahilyanagar Politics : लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकीमधील झालेला पराभव व त्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकमेकांना कात्रीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून (Nilesh Lanke) सुजय विखे यांचा पराभव (Sujay Vikhe) झाला.

मात्र आता याच पराभवाचा बदल घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा मैदानात (Ahilyanagar Politics) उतरले आहेत. आपल्या विरोधकांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. निळवंडेच्या पाणी प्रश्न असो किंवा संगमनेरचा खुंटलेला विकास तर दुसरीकडे नगर दक्षिणेत वर्षभरात झालेला कामाचा लेखाजोखा घेऊन विखे यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचं बदलतं राजकारण आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वेध असं विखेंचं गणित दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली. लंके यांच्या मदतीसाठी बाळासाहेब थोरात यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. विजयाचा गुलाल उधळण्याचा स्वप्नात आलेल्या विखेंना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विखे यांनी संगमनेरमध्ये राजकीय डाव टाकत थोरातांना नवख्या उमेवारावराकडून पराभवाची धूळ चारली. निवडणुकीतील पराभवाचा बदला पूर्ण झाला असं बोललं जात होतं मात्र सुजय विखे यांनी इथेच न थांबता आपल्या दोन्ही राजकीय शत्रूंना खिंडीत गाठण्यासाठी राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली.

दहशत मोडून काढणार:थोरातांना चॅलेंज

गेली चाळीस वर्षांपासून संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांनी एकहाती आपला गड शाबूत राखला. मात्र लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी विखे यांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात डाव टाकला. अमोल खताळ यांच्याकडून थोरातांचा पराभव झाला. संगमनेरमध्ये असलेली दहशत आपण मोडून काढणार तसेच मतदारसंघाचा खुंटलेला विकास याला जबाबदार कोण म्हणत विखे यांनी थोरातांवर निशाणा साधला. तसेच निळवंडेच्या पाण्यावरून विखे व थोरात यांच्यामध्ये शाब्दिक वार सुरूच आहे.

सुप्यात विमानतळ होणार? खासदार लंकेंचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन, दिला मोठा प्रस्ताव

तसेच याच निळवंडेच्या श्रेयवादावरून देखील विखे वेळोवेळी थोरातांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये टीकाटिपण्णी होत होती मात्र आता मंत्री विखेंच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी देखील आपले राजकीय शत्रू बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर चितपट करण्याचा डाव आखला.

लंकेच्या बालेकिल्ल्यात घुसून विखेंनी टाकला डाव

लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. पराभवामुळे विखे व लंके यांच्यामधील राजकीय शत्रुत्व वाढू लागले. निवडणुकीनंतर काही दिवस लंकेंविरोधात शब्दही न बोललेले सुजय विखे यांनी आता लंकेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यातच खासदार नीलेश लंके यांच्या होम ग्राऊंडवर विखे यांनी त्यांना चांगलच घेरलं. पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत खासदार लंकेंच्या सहकार पॅनलला विखे यांच्या जनसेवा पॅनलने धोबीपछाड दिली आहे. तसेच नगर दक्षिणेमध्ये गेल्या वर्षभरात काही विकासकामे झाली यावरून त्यांनी लंकेवर निशाण साधला. तसेच लंके यांच्या बालेकिल्ल्यात असलेली सुपा एमआयडीसीमधील दहशतीच्या मुद्द्यावरून विखेंनी लंकेंना घेरण्यास सुरुवात केली.

दरम्यान काही दिवसांमध्ये पारनेरमध्ये एका सिस्पे नावाच्या एका खासगी कंपनीने कोट्यवधींचा घोटाळा घातला. याचा मुख्य सूत्रधार कोण म्हणत एक प्रकारे विखे यांनी लंकेवर थेट आरोप केला. एका भाषणामध्ये बोलताना आपण याच जनतेच्या मदतीने पुन्हा एकदा खासदार होऊ असे म्हणत एक प्रकारे विखे यांनी पुन्हा एकदा 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लंकेंना चॅलेंज दिल्याचे देखील बोलले जात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विखेंनी मोर्चेबांधणी सुरु केली असून यामुळे महाविकास आघाडीचे नेते विखेंची गाडी रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मलाही काही लोक भेटली अन्…,शरद पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर विखे पाटलांचा खळबळजनक दावा

follow us