Download App

नगर दक्षिण लोकसभेवरुन रस्सीखेच! राम शिंदे हे विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक का?

(प्रवीण सुरवसे, अहमदनगर) : काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये (Ahmednagar BJP)असलेले अंतर्गत वाद हे चांगलेच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्यात अनेकदा शीतयुद्ध झाल्याचे समोर आले आहे. आता यामध्ये नगर दक्षिणच्या लोकसभेच्या (Nagar Dakshin Lok Sabha)उमेवारीची भर पडली आहे. शिंदे आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्यामध्ये यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. राम शिंदे यांनी नगर दक्षिणमधून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे शिंदे-विखे यांच्यात दरी वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र एकाच पक्षात असलेल्या विखे-शिंदे यांच्यामध्ये वाद नेमका आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊयात…

भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुलींचे राजकारण ‘महाराष्ट्रात’ करणार सेट : दोन मतदारसंघांमध्ये चर्चा

विधानसभा निवडणूक पराभवाला विखे कारणीभूत
2019 च्या कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री असलेले राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी पराभव केला होता. हा पराभव शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. शिंदे यांनी या पराभवामागे काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. एवढेच नव्हे तर विखे पाटील ज्या पक्षात जातात, तिथे खोड्या करतात असा घणाघात देखील त्यांनी केला. 2019 च्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात भाजपच्या प्रस्थापित उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे व प्रा. राम शिंदे यांचा समावेश होता. या पराभवांनंतर तिन्ही नेत्यांनी या पराभवाला विखे यांना जबाबदार धरले होते.

मी दम दिल्याचा पुरावा द्या, अन्यथा खोटे आरोप केल्याचं कबूल करा; सुनील शेळकेंचे थेट पवारांना आव्हान

विखेंमुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी झाली…
भाजपचे नगर जिल्ह्यात पाच आमदार होते. विखे पाटील व वैभव पिचड यांची भाजपात एंट्री झाल्याने पाच आमदारांची संख्या ही सात इतकी झाली. नगरमध्ये भाजपची ताकद वाढत असल्याचे वातावरण देखील निर्माण झाले. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर मात्र जिल्ह्यातील चित्रच बदलले. निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपचे अवघे तीनच आमदार शिल्लक राहिले. विखे पाटील यांच्यामुळे फायदा तर झालाच नाही, मात्र फटका बसल्याचा दावा पराभूत तीन उमेदवारांनी केला. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात, असा आरोप त्यावेळी शिंदे यांनी केला.

जामखेड बाजार समिती निवडणूक
राम शिंदे व विखे कुटुंबीयांमध्ये वादाची ठिणगी पडण्यास जामखेड बाजार समितीची निवडणूक ही देखील कारणीभूत ठरली. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची निवड झाली मात्र तरी देखील राम शिंदे हे नाराज होते. कारण या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पीए आणि समर्थक कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना या निवडणुकीत छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. बाजार समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. एकाच पक्षात असलेल्या जिल्ह्यातील या दोन बड्या नेत्यांमधील वाद आता लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील समोर येऊ लागला आहे.

शिंदे इच्छुक तर लोकसभेवरुन विखेंची कोंडी
येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार आहे. त्यानुषंगाने आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी दावा केला आहे. खासदार विखे यांनी देखील उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली आहे. यातून ते नगर दक्षिण मतदारसंघातील तालुक्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देत आहेत. शिंदे व विखे हे दोघे एकाच पक्षात असून दोघांनीही लोकसभेची तयारी केली आहे. भाजपकडून सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात असताना शिंदे यांनी टाकलेल्या गुगलीवर विखे क्लिनबोल्ड झाले आहे. शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यांमुळे विखेंची कोंडी होत आहे. यामुळे पुन्हा एकदा या दोघांमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

विखेंचे पक्षातील प्राबल्य शिंदेंची डोकेदुखी
गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेली राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर, गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षालाच मोठा फटका बसला. पराभूत उमेदवारांनी याबाबतचे गाऱ्हाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मांडले मात्र घडले उलटेच. राधाकृष्ण विखे यांचे स्थान आणि महत्व अधिकच बळकट झाले. विखेंकडे महसूल मंत्रिपद देण्यात आले. विखे पिता-पुत्रांना महाराष्ट्रातील नेत्यांचा आधार न घेता थेट केंद्रीय नेतृत्वाचे पाठबळ मिळू लागले. एका अर्थाने पक्षातच विखेंचे प्राबल्य वाढू लागले आहे. यामुळे देखील शिंदे अस्वस्थ होऊ लागले आहेत. त्यामुळे विखे कुटुंबियांना कोंडीत पकडण्याची एकही संधी शिंदे सोडत नाही.

follow us