Download App

सांस्कृतिक कार्यक्रमातून नगर दक्षिण लोकसभेची पेरणी…

प्रविण सुरवसे
लेट्सअप प्रतिनिधी

Ahmednagar News : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडणार असून आता त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तसेच नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नेतेमंडळी देखील पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आता मतदारसंघ फिरू लागले आहे. तसेच यंदाची नगर दक्षिण देखील चांगलीच गाजणार असे चित्र सध्या दिसते आहे. नुकतेच महासंस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विखेंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. तर एकीकडे हे सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी देखील एका महानाट्याचे माध्यमातून लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. तत्पूर्वी बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजप आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस देखील यंदा जोरदार झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे असो वा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी घेतलेले मेळावे हे सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून आता राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून येणाऱ्या नगर दक्षिण लोकसभेची पेरणी सुरु आहे.

यहाँ पे सब शांती शांती है…!!! सुजय विखे-राम शिंदे अर्धा तास शेजारी बसले पण चकार शब्दही बोलले नाहीत

‘महासंस्कृती महोत्सव’
नगर दक्षिण लोकसभा पाहता विद्यमान खासदार सुजय विखे व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून देखील मतपेरणी सुरु आहे . महासंस्कृती महोत्सव हा शासकीय कार्यक्रम जरी असला तरी या चार दिवसीय कार्यक्रमाची पूर्ण पकड हि विखेंकडे होती. दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी यंत्रणेचा वापर करत त्यांना कामाला लावत निवडणुकांपूर्वी स्वतःची ब्रॅण्डिंग करण्याचे काम यामाध्यमातून सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

भाजपात दुफळी…शिंदेही इच्छुक…
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी राम शिंदे यांचा वाढदिवस देखील जोरदार करण्यात आला. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे या माध्यमातून आयोजन करण्यात आले. राज्यात चांगली पकड असलेले व देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समजले जाणारे अशी राम शिंदे यांची ओळख आहे. यामुळे लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. मतदार संघात गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद ते साधता आहे.

आमदार लंके यांचे महानाट्य…
आमदार निलेश लंके यांनी दि. 1 ते 4 मार्च यादरम्यान नगर येथे महानाट्य आयोजित केलेले आहे ,वास्तविक पाहता याच या अगोदर महसूलमंत्र्यांनी नगर शहरांमध्ये महोत्सव आयोजित केला व त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले आता लंके यांनी महानाट्य आणले आहे त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांची पेरणी एक प्रकारे करण्याचा घाट या महायुतीतील लोकांकडून केला जात असून नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

‘थोरात ही जोरात’
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी चांगेलच चर्चेत होते. तत्पूर्वी येणाऱ्या काळात असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत थोरात यांचा यंदाच्या वर्षीचा वाढदिवस देखील तेवढाच जोरात झाला. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. यावेळी जमा झालेल्या गर्दीवरून तसेच जनतेचा कौल पाहत थोरात देखील लोकसभा निवडणुकीसाठी जोरात असल्याचे दिसून येतायत.

ढाकणे-घुले-तनपुरेही आघाडीवर…
शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांनी देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काही कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच महिलांसाठी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. विशेष म्हणजे येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा पाहता पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रताप काका सध्या दरदिवशी शेवगाव व पाथर्डी मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. कार्यक्रम कोणताही असो ढाकणे यांची आवर्जून उपस्थिती असते. यामुळे ढाकणे यांनी देखील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तर घुले देखील युवा मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करत आहे. दुसरीकडे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव देखील लोकसभेसाठी चर्चेत होते. मतदार संघात विविध कार्यक्रम त्यांनी देखील आयोजित केले होते.

दरम्यान, एकंदरीतच नगरमध्ये निवडणुकीच्या नावाखाली आता पुढाऱ्यांनी सांस्कृतिक उपक्रमाचा घाट घातला असल्याचे यामाध्यमातून दिसून येत आहे मात्र असे असले तरी या कार्यक्रमांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे तर याच माध्यमातून नेतेमंडळी देखील आपली वोट बँकेची देखील चाचपणी करत आहे. मात्र मतदार राजा कोणाला पसंती दर्शविणारी व कोणाच्या माथी विजयाचा गुलाल लावणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार हे मात्र नक्की…

follow us