Download App

‘गज कापून पळाले, शेतात लपले पण, जाळ्यात अडकलेच’; ‘त्या’ चार सराईतांना पुन्हा बेड्या

Ahmednagar News : संगमनेर कारागृहाचे गज कापून फरार झालेल्या चार सराईत गुन्हेगारांना पुन्हा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. कारागृहातून पळून गेल्यानंतर हे चारही आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका शेतात लपून बसले होते. तेथूनही पुढे पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र,  पोलिसांनी अतिशय चलाखीने त्यांना जाळ्यात अडकवून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, फक्त 36 तासांतच पोलिसांनी ही मोहिम फत्ते केली. काहीही करून या आरोपींना पकडण्याचे पोलिसांचे उद्दीष्ट होते. संगमनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून ही कामगिरी केली.

बुधवारी पहाटेच्या वेळी या चारही सराईत गुन्हेगारांना तुरुंगातील कोठडीचे गज कापले. कुणाला काही कळण्याच्या आत धुम ठोकली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेत या फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शोध मोहिम सुरू केली होती. या चारही आरोपींना गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. यातील एका आरोपीवर खून, दोघांवर अत्याचार आणि एकावर खूनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Ahmednagar : जड वाहतुकीला शहरातून बंदी घाला.. राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत दिला इशारा

पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटना ठिकाणी भेट देत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यावरुन घटनेचा अभ्यास करून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा पुढील तपास करून कैद्यांना तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे वाहनचालक व एक साथीदार अशा एकुण 6 जणांना जामनेर येथून ताब्यात घेण्यात यश मिळाले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षरक हेमंत थोरात, सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर आदी सहभागी झाले होते.

Tags

follow us