Download App

Ahmednagar News : मनपा स्थायी’ समितीचे सभापती कुमार वाकळेंचा राजीनामा; नव्या सदस्यांची नियुक्ती

Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेतील (Ahmednagar News) स्थायी समितीत (Standing Committee) १६ सदस्य असतात. त्यातील आठ सदस्यांचा कालावधी संपला होता. त्यामुळे या रिक्त आठ जागांवर आणि अचानक समिती सभापती कुमार वाकळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नवव्या जागेसाठी अशा एकूण नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी महापालिकेत महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे उपस्थित होते. या सभेत नवीन सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, शिवसेनेच्या तीन, भाजपच्या दोन व बसपची एक जागा रिक्त झाली होती. महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे गटनेत्यांनी नावांचा प्रस्ताव बंद लिफाफ्यात सादर केला होता.यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील त्र्यंबके, संपत बारस्कर, नजीर शेख, शिवसेनेकडून सुवर्णा गेनप्पा, कमल सप्रे, सुनीता कोतकर, भाजपकडून पल्लवी जाधव, प्रदीप परदेशी, बसपकडून मुदस्सर शेख यांची नावे जाहीर करण्यात आली. या निवडी जाहीर झाल्याने महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर स्थायी समितीत वर्णी लागली आहे.भाजपने पोटनिवडणुकीतून नगरसेवक झालेल्या दोन्ही नगरसेवकांना स्थायी समितीवर पाठविले.

हे वाचा : नगरमध्ये दडपशाही, दादागिरी वाढली; सातपुतेंचा कर्डिलेंवर गंभीर आरोप

दरम्यान, महापालिकेतील पक्षीय बलानुसार आठ सदस्य नियुक्त होतील असे वाटत असतानाच समितीचे सभापती कुमार वाकळे यांनी सभापतीपदासह समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे याच सभेत वाकळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नवव्या जागेवरही नियुक्ती करण्यात आली. मागील वर्षापासून राष्ट्रवादीने भूषविलेल्या सदस्याची मुदत संपली नसली तरी राजीनामा देण्याची पद्धत वापरली आहे. यामुळे पक्षाच्या इतर सदस्यांना समितीत काम करण्याची संधी मिळते.

वाकळे यांच्या राजीनाम्यामुळे सभापती पद रिक्त झाले आहे. या पदाच्या निवडणुकीसाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाईल. त्यांच्या आदेशानुसार सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळणार का ?

महापालिकेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सत्ता आहे. त्यांना काँग्रेसचाही (Ahmednagar Politics) पाठिंबा आहे.यावेळी स्थायी समिती सभापतिपद शिवसेनेला देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा याला विरोध आहे.पुढील वर्ष मनपा निवडणुकीचे असल्याने यावेळीही पद शिवसेनेला न देता आपल्याकडेच ठेवावे,असा आग्रह आहे. त्या अनुषंगाने संपत बारस्कर यांची समिती सदस्यपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.विशेष म्हणजे,सत्तेला सहकार्य असलेल्या काँग्रेसला मात्र अडीच वर्षात कोणतेही महत्त्वाचे पद दिलेले नाही.

Tags

follow us