MLA Nilesh Lanke : कोरोना संकटाच्या काळात आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी मोठं काम केलं. कोरोना रुग्णांची देखभालीसह त्यांना वेळेत उपचार (Covid 19) मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. कोविड सेंटरमध्ये थांबून त्यांनी रुग्णांची काळजी घेतली. त्यांच्या या कार्यशैलीची मोठी चर्चा त्याकाळात झाली होती. त्यांच्या याच कामाची दखल थेट फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (Thames International University) घेतली आहे. या विद्यापीठाच्यावतीने पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना ‘होरोनरीस कॉसा डॉक्टरेट’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. गोव्यातील पणजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. रिपु राजन सिन्हा, डॉ. अरुण ओमिनी, डॉ. प्रियदर्शनी नायक, डॉ. संग्रामसिंह माळी यांच्या हस्ते पदवी देऊन आ. लंके यांना सन्मानित करण्यात आले.
मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातले होते. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar News) या आजाराचा मोठा फैलाव झाला होता. सर्व दवाखाने भरून गेले होते. त्यामुळे या काळात रुग्णांना उपचार मिळणे अतिशय कठीण झाले होते. अशा परिस्थितीतही आ. निलेश लंके यांनी कोरोना बाधितांवरील उपचारासाठी स्वतःला झोकून दिले. लॉकडाऊन काळात नागरिकांसाठी त्यांनी अन्नछत्र सुरू करून त्यांची उपासमार होऊ दिली नाही.
Corona Update : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; राज्यात 24 तासांत 11 नवे रूग्ण, मुंबईत सर्वाधिक रूग्ण
लॉकडाऊनमुळे परराज्यांमधील नागरिक त्यांच्या घरी परतत असताना त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था करण्यासाठी आ. लंके यांनी पुढाकार घेतला होता. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तोंडभरून कौतुक केले होते. त्यानंतर आता थेट फ्रान्समधील विद्यापीठाने त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे. पणजी येथे पार पडलेल्या या पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला.