Download App

नगरसाठी शरद पवारांचं काय ठरतंय? ढाकणे, तनपुरे की आणखी कोण? लवकरच फैसला

Loksabha Election 2024 : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून (Loksabha Election 2024) हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची देखील चाचपणी होऊ लागली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर दोन नावांची चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे देखील नाव चर्चेत आहे. यामुळे आता नगर दक्षिणमधून विखेंच्या विरोधात शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वतयारीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीनिवास पाटील, एकनाथ खडसे, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, शशिकांत शिंदे, संदीप क्षीरसागर, हेमंट टकले, रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

Ahmednagar News : निवडणुकांच्या तोंडावर विखेंकडून निधी मंजुरीचा धडाका; जिल्हा विकासासाठी 630 कोटी मंजूर

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान या झालेल्या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांची नावे चर्चेत आली आहेत. या दोघांव्यतिरिक्त तिसरे नाव देखील चर्चेत आहे ते म्हणजे राजेंद्र फाळके यांचे असे सांगितले जात आहे.

पक्षश्रेष्ठींनी आखलेल्या रणनितीनुसार आपआपल्या मतदारसंघात नियोजन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. पक्ष संघटन बळकट करत आम्ही सर्व कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी प्रताप ढाकणे यांनी दिली. तसेच पक्षाने संधी दिली तर आम्ही देखील निवडणूक लढवू असे देखील यावेळी ढाकणे म्हणाले. शेवटी पक्षश्रेष्ठी सर्व काही ठरवत असतात त्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतले जातात. मात्र येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहे असेही ढाकणे म्हणाले.

रोहित पवार लोकसभा लढवणार का?

नगर दक्षिण लोकसभेसाठी विखेंविरोधात प्रबळ असा चेहरा म्हणून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र रोहित पवार यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्यात राहण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा निवडणुकीसाठी नाव सध्या तरी मागे पडले आहे. नगर दक्षिणसाठी आता आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रताप ढाकणे यांची नावे चर्चेत आहेत.

Ahmednagar : थोडं थांबा, लवकरच ‘मविआ’ सरकार येणार; राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

ढाकणे-तनपुरे अॅक्टिव्ह

राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणूकची (Elections 2024) तयारी सुरु झाली आहे. विकासकामे, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी थेट विधानसभेत देखील आवाज उठवला होता, अनेक कामांबाबत स्वतः पाठपुरावा करत ते मंजूर देखील केले. तसेच विविध मुद्द्यावरून ते सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. तर दुसरीकडे प्रताप ढाकणे हे देखील चांगलेच आक्रमक झाले आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेणे, नागरी समस्यांसाठी आंदोलने करणे, पक्ष संघटन, बळकटीकरणसाठी ते सध्या सरसावले आहे. यामुळे येत्या काळात शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी कुणाच्या नावाची घोषणा होणार की ऐनवेळी पवारांच्या धक्कातंत्रानुसारच नवीनच उमेदवार समोर येणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज