Download App

थोरातांचा इशारा, विखेंचा अ‍ॅक्शन मोड! ‘निळवंडे’च्या पाण्याचे ‘शेड्यूल’च सांगितले

Radhakrishna Vikhe : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांतील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन गांभीर्याने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी त्यांनी पुन्हा आढावा घेतल्यानंतर उर्वरीत काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. काम पूर्ण होताच कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.‌

दरम्यान, निळवंडे धरणातून तत्काळ पाणी सोडण्याची मागणी मंत्री विखे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली होती. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही थोरात यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच धरणातून पाणी सोडण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या मुद्द्यावर थोरातांनी आंदोलन करण्याच्या आधीच कदाचित पाणी सोडलेही जाईल अशी परिस्थिती दिसत आहे.

‘फक्त 40 तासांत राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांचा निकाल’; राऊतांचा मोठा दावा

निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणीचा शुभारंभ ३१ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. निळवंडे प्रकल्पाच्या डावा कालवा व त्यावरील शाखा कालव्यांच्या शेवटपर्यंत केवळ 12 दिवसांमध्येच सुमारे 120 किलोमीटर लांबीत यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते.

प्रकल्पाचा डावा कालवा २ ते २८ किलोमीटर हा अकोले तालुक्यातील निवळ, म्हाळादेवी मेहंदुरी व कळस या भागातून जातो. अकोले तालुक्यातील भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्यामुळे काही लांबीत एका बाजूला डोंगर व कठीण खडकातील खोदाई व दुसऱ्या बाजूला 14-15 मी. उंचीचे माती भराव काम करून कालव्याचे काम करण्यात आलेले असल्याने सदर ठिकाणी कालवा खोदकाम करताना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले, तसेच काही भागातील खडक सछिद्र व भेगा असलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे अकोले तालुक्यातील निवळ, म्हाळादेवी, मेहंदुरी व कळसच्या भागामध्ये कालवा तळातील खडकामधील सपामधून गळती होत असल्याचे प्रथम चाचणीच्या वेळी निदर्शनास आले होते.याच कारणामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते ही बाब प्राधान्याने विचारात घेण्यात आली आहे.

काहींना वाटले सुट्टी घेतली तर संपले, पण मी संपणाऱ्यातील नाही; पंकजांचा रोख नेमका कोणावर?

कालव्याची दुरूस्ती न करताच पाणी सोडल्यास व पुन्हा पाझर झाल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो याबाबत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला आधीच आंदोलनाचे इशारे देवून ठेवले असल्याची बाब लक्षात घेवून कठीण खडकाच्या भागामध्ये कालवा तळात आणखी खोदाई करून त्यात काळी माती भरणे, मोठ्या भरावाच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे अशा प्रकारच्या गळती प्रतिबंधक उपाय योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

अकोले तालुक्यात पावसामुळे काळी माती उपलब्ध होण्यास व काँक्रीटचे काम शीघ्रगतीने करण्यास अडचण निर्माण होत असल्याने सदरील कामे लवकर पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे सांगतानाच पावसाने उघडीप दिल्यास उपरोक्त कामे पूर्ण करून, क्रॉस रेग्युलेटर व रिटेनिंग वॉलचे काम सुरक्षित पातळी पर्यंत आणून आवश्यकता भासल्यास मोठी गळती असलेल्या भागात प्लास्टिक कागदाचा वापर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

Tags

follow us