Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे अशा शब्दात कर्डिलेंनी थोरातांवर निशाणा साधला.
भारताच्या प्रयत्नांना मोठे यश, कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द
राहुरी तालुक्यातील कनगर येथे शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी बोलताना खासदार विखे यांनी देखील विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विखे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ज्या गतीने कामे मार्गी लागली ती कामे विरोधी पक्षाकडे तीन वर्ष सत्ता असूनही लागली नाहीत असेही यावेळी सुजय विखे यांनी सांगितले.
नितीश कुमार मोठा निर्णय घेणार? PM पदावरुन इंडिया आघाडीत घुसमट; अद्याप सस्पेन्स कायम…
ते म्हणाले की, विखे घराणे निळवंडेचे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी करून घाणेरडे राजकारण केले, मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडेला पाणी सोडण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच, येत्या 22 तारखेला निळवंडे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांची सत्ता असल्यावर कोणतीही विकासकामे करण्यात आली नाही. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यात आला असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज न देऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे, असा सवाल विचारून येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दांत त्यांनी यावेळी नाव न घेता आमदार प्राजक्त तानपुरेंना शाब्दिक टोला लगावला.
तसेच 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार असून प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे. निळवंडेच्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील, याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे असेही त्यांनी सांगितले. तसेच निळवंडेबाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडेसाठी काय-काय केले? हे तपासले पाहिजे. तुम्ही घरी बसून बाता मारता, मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो. तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडेसाठी योगदान काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला.