Ahmednagar News : नगर आष्टी या रेल्वेला काही दिवसांपूर्वी आग (Ahmednagar News) लागली होती. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा प्रकार सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर या घटनेची चौकशी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी केली आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या आगीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी नगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र या आगीसंदर्भात आता काही खळबळजनक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेवरून काही संशय देखील व्यक्त केला जात आहे. आष्टी रेल्वेला जेव्हा आग लागली तेव्हा त्यामध्ये प्रवासी नव्हते. प्रवासी नसताना आणि नवीन गाडीला आग कशी लागू शकते? असा सवाल सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी उपस्थित केला आहे.
Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप
सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक सोलापूर येथे पार पडली. या बैठकीत नवीन आष्टी रेल्वे आग प्रकरण व अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. ही बैठक विभागीय रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.के. रनयेवले, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ परिचारक प्रदीप हिरदे, अहमद फैज, डीएसपी दीपक कुमार आझाद, सुदर्शन देशपांडे आदी उपस्थित होते.
शॉर्ट सर्किट अन् इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग
सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी बैठकीत नुकतीच अहमदनगर-आष्टी रेल्वेला जी आग लागली त्याची चौकशी करण्याची मागणी केली. यामध्ये रेल्वे विभागाच्या वतीने शॉर्ट सर्किट आणि इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र ही आग संशयाच्या भोवऱ्यात असल्याची शंका यावेळी मुनोत यांनी उपस्थित केली. आष्टी रेल्वेला जेव्हा आग लागली त्यावेळी रेल्वेत अधिकृत प्रवासी नव्हता. प्रवासी नसताना आणि नवीन गाडीला आग कशी लागू शकते? ही मोठी शंका असल्याचे मुनोत यांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
शिंदे सरकारकडून पहिली आश्वासनपूर्ती; कुणबी समितीच्या जीआरची प्रत जरांगेपर्यंत पोहचली
नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे संदर्भात कार्यवाहीची माहिती विचारण्यात आली. त्याला सोलापूर विभागाच्या मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोलापूर विभागाने इंटरसिटीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दिला असून, हडपसर आणि पुणे रेल्वे स्थानक येथे गर्दी असल्याने पुणे विभागातून या रेल्वेसाठी अजून हिरवा कंदील मिळाला नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या बैठकीत नारायणडोह येथील माल धक्क्याची प्रगती, रेल्वे स्थानकावर असलेले अनधिकृत विक्रेते या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, रेल्वेला आग कशामुळे लागली याच्या स्पष्टीकरणात रेल्वेने शॉर्ट सर्किट आणि इलेक्ट्रिक बिघाडाचे कारण दिले आहे. त्यामुळे आता सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर रेल्वे या प्रकरणाचा तपास करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
थेट रेल्वेमंत्र्यांकडेच केली होती चौकशीची मागणी
दरम्यान, या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी याआधीही करण्यात आली होती. अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समितीचे हरजितसिंह वधवा व सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी केली होती. या मागणीचे निवेदन तातडीने रेल्वेचे महाप्रबंधक, सोलापूर विभागीय रेल्वे प्रबंधक आणि रेल्वेमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.