प्रविण सुरवसे – लेट्सअप मराठी
Shevgaon Assembly constituency : यंदाचे वर्ष हे देशासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसं राज्याच्या दृष्टीने देखील यंदाचे वर्ष हे महत्वाचे आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2024) होणार आहे. दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये (Shevgaon Assembly constituency) भाजपचे विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monica Rajle) आहेत. मात्र यंदाची ही निवडणूक राज्यात गाजणार असे दिसून येत आहे.
भाजप आणि काँग्रेसमध्ये गटबाजी आहे तर राष्ट्रवादी-शिवसेनेला खिंडार पडल्यामुळे राजकारणाची समीकरण बदलली आहे. यामुळे 2014 व 2019 मध्ये भाजपने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघामध्ये सलग विजय मिळवला होता मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजप विजयाची हॅट्रिक करणार की मतदारराजा राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मोदी लाट अन् 2014 मध्ये विजयाची माळ
2014 मध्ये विधानसभेची निवडणूक सुरू होण्याआधीच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. शेवगाव-पाथर्डी मध्ये मुंडे यांना मानणारा मोठा गट आहे. त्यावेळी भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या सहानभूतीमुळे मोनिका राजळे यांच्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण झालं होते. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले यांचा तब्बल 50 हजाराहून अधिक मतांनी दणदणीत पराभव करत या मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान पटकाविला होता.
भाजपच्या हाती बडा मासा, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्याविरोधात उमेदवार ठरला
घुले कुटुंबाला मोठा धक्का
मोठा राजकीय वारसा असलेल्या चंद्रशखर घुले यांना 2014 च्या निवडणुकीत त्यांचा हक्काचा बालेकिल्ला समजला जाणारा शेवगाव तालुक्यातूनच अपेक्षित मताधिक्य घेता आले नाही, तर दुसरीकडे मोनिका राजळे यांनी शेवगावसह पाथर्डी तालुक्यातून मोठी लीड घेत घुले यांना पराभूत केले होते. मोनिका राजळे यांच्या सासरचा राजकारणाचा वारसा होता. त्यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे माजी आमदार होते. तर त्यांचे सासरे अप्पासाहेब राजळे सुद्धा माजी आमदार होते. घरातूनच त्यांना राजकीय वारसा मिळाला. त्यामुळे 2014 ची निवडणूक जिंकत त्यांनी तालुक्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवला.
ढाकणे-राजळे लढत मात्र सहानुभूतीची लाट...
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजळे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचे आव्हान होते. ढाकणे यांच्यासाठी खुद्द शरद पवार हे देखील मैदानात उतरले होते. मात्र 2017 मध्ये मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे यांचे निधन झाले अन् राजळे यांच्यासाठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली मात्र त्यांना स्वपक्षीयांकडूनच मोठा विरोध सहन करावा लागला होता.
ठाकरे गट रणशिंग फुकणार…संजय राऊतांच्या उपस्थितीत नगरमध्ये महामेळावा
“राजळे हटाव, भाजप बचाव” या घोषणांसह राजळे विरोधी मोहिमेला स्थानिक भाजपमध्ये वेग आला होता. याचा फायदा घेत प्रताप ढाकणे यांनी जोरदार प्रचार सुरु केला. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघामध्ये प्रताप ढाकणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या सभा मेळाव्यांना मोठी गर्दी असते. एक धडाडीचा नेता आणि परखरड वक्तृत्व व मैत्री जपणारी व्यक्ती अशी ओळख असलेल्या ढाकणे यांना 2019 मध्ये मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
2024 मध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
मोनिका राजळे या विद्यमान आमदार असून त्यांची दुसरी टर्म पूर्ण होणार असून आता त्या त्या तिसर्या टर्मच्या तयारीत आहेत. असे असतानाच पंकजा मुंडे देखील या मतदार संघातून इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आले. पंकजा मुंडे यांची शेवगाव-पाथर्डीतील उमेदवारीची चर्चा त्यांच्यासाठी अस्वस्थता निर्माण करणारी आहे.
रामदास आठवले शिर्डी लोकसभा लढवणारच…तयारी झाली; साळवेंनी स्पष्ट सांगितलं
तर दुसरीकडे ढाकणे यांनी देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मतदार संघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेणे, नागरी समस्या, आंदोलने याद्वारे निवडणुकीची तयारी करत आहे. सध्याच्या घडीला तरी राजळे विरुद्ध ढाकणे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र बदलत्या राजकीय समीकरणामुळे यंदाच्या विधानसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.