मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादात राष्ट्रवादीची (NCP) सरशी झाली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे, यंदा प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkre) यांना देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे.
राज्य शासनाकडून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यासाठी 27 मंत्र्यांना 27 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यात बहुतांश जिल्हे विद्यमान पालकमंत्र्यांकडेच देण्यात आले आहेत. तर उर्वरित ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करण्याचे आधिकार देण्यात आले आहेत. मात्र यात रायगडच्या नावाने लक्ष वेधून घेतले आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. पुणे, सातारा आणि रायगड या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांची मागणी अजितदादांच्या गटाकडून करण्यात आली होती. यातील पुण्याची मागणी पूर्ण झाली आहे. तर साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोध दर्शविला आहे.
रायगडमध्येही शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शविली आहे. रायगडचे पालकमंत्री पद सध्या शिवसेनेकडून असून उद्योग मंत्री उदय सामंत हे पालकमंत्री आहेत. मात्र हे पद राष्ट्रवादीला देण्यास आणि त्यातही तटकरेंना देण्यास गोगावलेंचा विरोध आहे.
26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तिथले ध्वजारोहण करतात, असे मानले जाते. यातूनच गतवेळी 15 ऑगस्ट रोजी आदिती तटकरे यांना रायगडमध्ये ध्वरारोहण करु देण्यासही गोगावले यांनी विरोध दर्शविला होता. हा विरोध इतका तीव्र होता की तटकरे यांना त्यावेळी ध्वजारोहणासाठी पालघरला पाठविण्यात आले होते.
पण आता मात्र आदिती तटकरे यांना रायगडमध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे गोगावलेंचा विरोध मावळला आहे का? रायगडचा तिढा सुटला आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – पुणे
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
विजयकुमार गावित – भंडारा
हसन मुश्रीफ – कोल्हापूर
अब्दुल सत्तार – हिंगोली
चंद्रकांत पाटील – सोलापूर
दिलीपराव वळसे पाटील – बुलढाणा
गिरीश महाजन – धुळे
सुरेश खाडे – सांगली
तानाजी सावंत – धाराशिव
उदय सामंत – रत्नागिरी
दादाजी भुसे – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ
गुलाबराव पाटील – जळगाव
संदीपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
धनंजय मुंडे – बीड
रविंद्र चव्हाण – सिंधुदुर्ग
अतुल सावे – जालना
शंभूराज देसाई – सातारा
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
धर्मरावबाबा आत्राम – गोंदिया
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – नंदुरबार
दीपक केसरकर – ठाणे
आदिती तटकरे – रायगड
येत्या 26 जानेवारी रोजी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात एकाच वेळी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी सव्वा नऊ वाजता राज्यभर एकाच वेळी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करावे असे आदेश शिंदे सरकारने दिले आहेत. या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी साडे आठ वाजण्याच्या पूर्वी किंवा दहा वाजल्यानंतर करावा, असेही सांगण्यात आले आहे.