Shevgaon Pathardi Constituency : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात गेल्या अनेक (Shevgaon Pathardi) दशकांत काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी दिसून येत असल्याचा आरोप भाजप नेते पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी केला. यानंतर दौंड यांनी थेट निवडणुकीत उमेदवारीच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. दौंड यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भारतीय जनता पार्टीच्या अडचणी वाढणार आहेत. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासमोरील (Monika Rajale) आव्हानं वाढली आहेत.
गोकुळ दौंड आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गोकुळ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वासित केले. या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. आ. मोनिका राजळे या २०१४ आणि २०१९ ला सलग निवडून आल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा आहे.
हर्षदा काकडेंच्या एन्ट्रीने राजळे, ढाकणेंचं टेन्शन वाढलं; शेवगाव-पाथर्डीचं गणित काय?
त्यामुळे मतदारसंघात दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे. यातच दौंड यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दौंड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे. तसे झाल्यास विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. जनतेला आता बदल हवा असून याच मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचे दौंड म्हणाले. पक्षाने उमेदवारी दिल्यास पक्षाकडून अन्यथा अपक्ष उमेदवारी करायचीच असा निर्णय गोकुळ दौंड यांनी घेतला आहे.
नगरमध्येही शेवगाव स्कॅम पॅटर्न! महिन्याला भरघोस व्याज देतो, 76 लाखांना गंडवलं..