Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरत थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे फिल्डिंग लावली. आणि रोहित पवार प्रयत्न करत असलेल्या एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करून टाकला. यासाठी त्यांनी नीरव मोदीच्या जमिनीचे कारण पुढे केले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही कर्जत एमआयडीसीसाठी जी जमीन प्रस्तावित होती त्यात नीरव मोदीची जमीन नाही. एमआयडीसीही तिथेच होणार असे स्पष्ट सांगितले होते. त्यावर आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत या वादाला आणखीच धार दिली आहे.
राम शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, खरंतर मी मंत्री असतानाच कर्जत एमआयडीसीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. 2019 ला माझा पराभव झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली. पण, त्यांच्या मनात पाप आहे. नीरव मोदीची जागा या एमआयडीसीत घेण्यासाठी हा अट्टाहास आणि आटापिटा सुरू आहे, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
Rohit Pawar : ‘सुनावणी संपण्याधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
शिंदे पुढे म्हणाले, ते नीरव मोदीसाठी लढतात तर मी कर्जत-जामखेडच्या युवकांसाठी लढत आहे. युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी मी लढतोय. आता उद्योग विभाग या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला आहे की मागील अधिवेशनात जी कागदपत्रं दिली गेली होती त्या कागदपत्रांच्या आधारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं की तुम्ही दिलेल्या कागदपत्रांत तथ्य आहे. सत्यता आहे. आम्हीही पडताळून पाहिलं आहे. त्यामुळे नीरव मोदीची जमीन एमआयडीसीसाठी आपल्याला घेता येणार नाही. तसेच तिथल्या स्थानिक आणि ग्रामपंचायतींनी ठरावही केली आहे की या एमआयडीसीला आमचा विरोध आहे. या दोन कारणांमुळे त्या जागेवरची एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय उद्योगमंत्र्यांनी घेतल्याचे शिंदे म्हणाले. पण त्याचवेळी कर्जत एमआयडीसीसाठी सरकारच्या सर्व नियम निकषांचे पालन करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उद्योगमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नीरव मोदी माझ्या घरचा माणूस आहे का ?
राम शिंदे उद्योगमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता, असे पत्रकारांनी विचारल्यावर नीरव मोदी काय माझ्या घरचा माणूस आहे का? असा सवाल शिंदेंनी केला. नीरव मोदीच्या जमिनीत कुणाचा हिस्सा आहे हे सुद्धा जाहीर झालं पाहिजे. नीरव मोदीची जमीन घेऊन तुम्हाला त्याच ठिकाणी एमआयडीसी का करायची? याचं उत्तर आधी दिलं पाहिजे. युवकांसाठी एमआयडीसी करताय की नीरव मोदीसाठी करताय हा खरा प्रश्न आहे.
अजितदादांनी माझ्या पत्रावर निधी दिला
माझा हिशोब काहीच बाकी नाही. तिथल्या लोकांना आजही विचारा की नीरव मोदीचा हिस्सेदार कोण आहे? अख्ख्या कर्जत तालुक्यात माझी कुठेच जमीन नाही. माझ्या पत्रावर अजितदादांनी कर्जतसाठी 45 कोटींची तरतूद केली आणि ते अजितदादांचे आभार मानतात. हे जी दुटप्पी भूमिका आहे ते लोकांनी आता ओळखलं आहे. मी अजितदादांना स्पष्टच विचारलं की दादा तुम्ही कुणाच्या पत्रावर निधी दिला तर अजितदादाही म्हणाले तुझ्याच पत्रावर निधी दिला. तुम्हीच तिथले आमदार आहात. विरोधी पक्षाच्या आमदाराच्या पत्रावर निधी देण्याची तरतूदच नाही आपल्याकडे, असे शिंदे म्हणाले.
Ram Shinde : 2024 फार लांब नाही, मी तयारच.. राम शिंदेंनी पवारांविरोधात ठोकला शड्डू!
फुगड्या खेळणे, फुलं उधळणे असा संघर्ष असतो का ?
सरकारला युवकांचं देणंघेणं नाही म्हणता मग यांना घेणंदेणं आहे का. यांनी काय केलं युवकांसाठी. संघर्ष असा असतो का, स्वतःच्या अंगावर फुलं उधळून घेणे, डीजेपुढे नाचणे, फुगडी खेळणे, विहिरीत उड्या मारणे, तलावात उड्या मारणे हा कोणता संघर्ष आणला आहे असा संघर्ष कधी नसतो. त्यांनी (रोहित पवार) त्यांच्या जीवनात कधीच संघर्ष पाहिलेला नाही त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत आहेत.
माझा नातू कारखानेच कारखाने काढील
कर्जत एमआयडीसीच्या संदर्भात मला म्हणतात की तुमचं गुऱ्हाळ सुद्धा नाही. राम शिंदे गुऱ्हाळ सुद्धा काढू शकला नाही. त्यांचा तो आरोप मला मान्य आहे. पण माझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता. चुलता चार वेळा मुख्यमंत्री नव्हता. त्यांच्या आजोबांनी सुद्धा एकही कारखाना काढल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे माझी ही सुरुवात आहे. आता राजकारणात माझी सुरुवात झाली आहे. आमदार झालो, मंत्री झालो पण माझा नातू नक्कीच कारखानेच कारखाने काढील. त्यामुळे दुसऱ्याला बोलण्याची आवश्यकता नाही. स्वतःचं कतृत्व शून्य. सगळं काकांच्या, आजोबांच्या मेहेरबानीवर झालं आहे. मी गुऱ्हाळ काढलं नाही पण माझा नातू नक्की काढील.