Rohit Pawar : ‘सुनावणी संपण्याधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज आक्रमक मूडमध्ये दिसत होते. त्यांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार, आमदार अपात्रता सुनावणी, अमोल मिटकरी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले तसेच कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे या सगळ्यांनाच फटकारले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर (MLA Disqualification Case) बोलताना रोहित पवार यांनी निकाल पुढे ढकलण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राजीनाम देऊ शकतात, असे खळबळजनक विधान केले.
रोहित पवार म्हणाले, संविधानातून निर्णय द्यायचा झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात द्यावा लागेल. ही राजकीय आत्महत्या ठरेल. यामुळे निकालच पुढे ढकलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात. मग नवीन अध्यक्ष नेमण्यात येऊन सुनावणी पुढे ढकलली जाईल किंवा न्यायालयातून निर्णय घ्यावा लागेल, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माझ्यावर लाठीचार्ज झाला असं म्हणालोच नाही
संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळावर बोलताना रोहित पवार म्हणाले, माझ्यावर लाठीचार्ज झाला असे मी कुठेही बोललो नाही. माझे देखील कपडे तिथे फाटले होते. एखाद्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला तर तो नेत्यावरही होतो. अमोल मिटकरींना एवढं महत्व का देता, त्यांचा पराक्रम काय तो कळेलच. सामान्य लोकांसाठी केलेले आंदोलन तुम्हाला स्टंट वाटत असेल तर तुम्हाला सामान्य लोकांबद्दल काही वाटत नाही असंच म्हणावं लागेल.
एमआयडीसीच्या जमिनीत नीरव मोदीची जमीन नाही
राम शिंदे आमदार असतानाच नीरव मोदी याने जमीन विकत घेतली होती. कर्जत एमआयडीसीसाठी आम्ही जी जमीन फायनल केली त्यात नीरव मोदीची जमीन नाही. एमआयडीसीचा प्रश्न राम शिंदे यांच्याकडून मार्गी लागेल असे वाटत नाही. मुख्यमंत्री यांनी माझ्यावर कौतुकाची थाप ही खरी मारली की फोटोपुरती मारली हे येत्या अधिवेशनात कळेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
एमआयडीसीवरुन राजकारण तापलं; तरुणांच्या भवितव्याशी खेळू नका, रोहित पवारांचा हल्लाबोल
अजितदादांचं वक्तव्य चुकीचंच
युवकांवर कुणीही शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत, तर ही सगळी गरीबांची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे जर ते सरकारकडे येत असतील, मदत घेत असतील तर त्याच चुकीचं काय असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का, ज्या मुलांकडं क्षमता आहे, बुद्धीमत्ता आहे. ती मुलं जर आर्थिक मदतीसाठी सरकारकडे येत असतील तर यात काहीच चूक नाही. कुणीही या युवकांवर शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा मी निषेध करतो.