Download App

“फडणवीसांनी जबाबदारी दिली मी पूर्ण समाधानी”; मंत्रि‍पदावर विखेंनी स्पष्टच सांगितलं

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.

Radhakrishna Vikhe on Minister Post : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपवली याबद्दल मी समाधानी आहे. स्‍व.लोकनेते पद्मभूष बाळासाहेब विखे पाटील यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पूर्ण करण्‍याची संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर विखे पाटील यांचे अहिल्‍यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ.विखे पाटील फौंडेशन येथे जेष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांचे आशिर्वाद घेतले.यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते,अरुणकाका जगताप, नाशिक विभागाचे आयुक्‍त डॉ.प्रविण गेडाम, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदींनी त्‍यांचे स्‍वागत केले.

विखे पाटील पुढे म्‍हणाले की, राज्‍य मंत्रिमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्‍याची एक संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्‍या जबाबदारीतून बाळासाहेब विखे पाटील यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍याचे दायित्‍व मुख्‍यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्चितपणे यशस्‍वी करण्‍यासाठी माझा प्रयत्‍न असेल असे त्‍यांनी सांगितले.

छगन भुजबळ फडणवीसांत पाऊण तास खलबतं, भुजबळ म्हणाले, “आठ ते दहा दिवसांनंतर..”

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात वळविण्‍यासाठी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्‍ट्र पाणी परिषदेच्‍या माध्‍यमातून केंद्र आणि राज्‍य सरकारला मसुदा सादर केला होता. त्‍याचेच आता धोरणात रुपांतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्‍वाकांक्षी प्रकल्‍प पूर्ण करणाचे ध्‍येय ठेवले आहे. राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्‍याने गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात पाणी वळविण्‍याचे काम भविष्‍यात पूर्ण करण्‍यासाठी वाटचाल असेल.

कृ‍ष्‍णा खोऱ्यातील पाणी प्रश्‍नाबाबतही निश्चित असे धोरण घ्‍यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण शेतीच्‍या पाण्‍याचे निर्माण होणारे प्रश्‍न, पाण्‍याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्‍याच्‍या वितरण व्‍यवस्‍थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

निवडणुकीतच मविआत बिघाडी

विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले, विरोधी पक्षाचा अवतार निवडणुकीतच संपला होता. निवडणुकी दरम्‍यान महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली होती. त्‍यांचे अस्तित्‍व आता राहीलेले नाही. मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी नव्‍या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. यापूर्वी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले आरक्षण कायदेशीरदृष्‍ट्या टिकले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्‍याबाबत आमचे सरकारही सकारात्‍मकच आहे. मात्र मध्‍यंतरी महाविकास आघाडी सत्‍तेवर आल्‍यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले. आरक्षणाच्‍या बाबतीत महाविकास आघाडी गंभीर नव्‍हती याचे पाप त्‍यांच्‍या डोक्‍यावर आहे.

हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी…; उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर घणाघाती टीका

मराठा आरक्षणाबाबत सरकारला वेळ द्या

राज्‍यात महायुतीचे सरकार होते त्‍यावेळी आरक्षणाच्‍या बाबतीत आवश्‍यक तेवढे सर्व निर्णय घेण्‍यात आले होते. मागासवर्ग आयोगाची निर्मिती केली. राज्‍यात ५८ मोर्चे आणि अनेकांचे बलिदान झाले. पण ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळण्‍याची जबाबदारी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्‍वी केली होती. आताही त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍यात नव्‍याने सरकार स्‍थापन झाले आहे. इतर कोणत्‍याही समाजाच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता चर्चेतून हा प्रश्‍न सोडविता येईल. जरांगे पाटलांनी नव्‍या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

राहुल गांधी जबाबदारी घेणार का?

बीड आणि परभणी येथील घटनांबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या दोन्‍हीही घटनांबाबत मुख्‍यमंत्र्यांनी नागपूर आधिवेशनामध्‍ये सरकारची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. या दोन्‍हीही घटनांतील दोषींवर कारवाई करण्‍याच्‍या सूचनाही देण्‍यात आल्‍या आहेत. चौकशी समितीही नेमण्‍यात आली असून या घटनेचे आता विरोधकांनी राजकारण करू नये. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येऊन जातील परंतु त्‍यानंतर निर्माण होणारा सामाजिक तणाव तसेच जातीजातींमध्‍ये उमटणारे पडसाद याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

follow us