छगन भुजबळ फडणवीसांत पाऊण तास खलबतं, भुजबळ म्हणाले, “आठ ते दहा दिवसांनंतर..”

छगन भुजबळ फडणवीसांत पाऊण तास खलबतं, भुजबळ म्हणाले, “आठ ते दहा दिवसांनंतर..”

Chhagan Bhujbal Meeting with Devendra Fadnavis : मंत्रिमंडळातून डावलले गेल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. मंत्रिपद कुणामुळे मिळालं नाही याचा थेट खुलासा त्यांनी केला नसला तरी त्यांचा रोख राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आहे हे आता लपून राहिलेलं नाही. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. यातच आज छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ या दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या नेत्यांत जवळपास पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली.

भुजबळ म्हणाले, मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं बऱ्याचशा गो्ष्टी मी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. आपण मान्य केलं पाहिजे की महायुतीला जो विजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळं लाभलं. त्यांचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आभार मानले पाहिजे. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मला आहे. त्यांचे नुकसानही होऊ देणार नाही.

पण आता राज्यात जे काही सुरू आहे. वेगळं वातावरण आहे. आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू. राज्यातील ओबीसी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही निरोप द्या की मी यावर विचार करतोय. शांततेनं घ्या. दहा बारा दिवसांत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपाचा स्वीकार करणार का असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला असता या प्रश्नावर उत्तर देणं भुजबळांनी टाळलं.  ते फक्त इतकंच म्हणाले, मी जास्त काही बोलणार नाही. याआधीच मला जे काही बोलायचं होतं ते मी बोललो आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर फडणवीस यांच्याबरोबरील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची खरी माहिती बाहेर आलेली नाही. पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठ्या घडामोडी घडत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube