नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी दिली. करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, की ‘मनमाडकरांनी महिना महिना पाणी मिळत नसेल तर आमचा उपयोग काय ? पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ग्रामीण भागात हजारो पाणीयोजना सुरू केल्या. त्यामुळे आता तुम्हालाही रोज पाणी मिळणार, तुम्ही काय घोडं मारलंय ? या इतिहासात जाणार नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) मुख्यमंत्री होते. त्यावेळी मी ही मंत्रिमंडळात होतो. या काळात आम्ही अनेक योजना सुरू केल्या. मात्र मधल्या अडीच वर्षांच्या काळात त्या पूर्णपणे थांबल्या. मागील सहा महिन्यांपूर्वी आपले सरकार आले. जर हे सरकार आले नसते तर अजूनही पाणीयोजना झाली नसती,’ असे शिंदे म्हणाले. ‘केंद्र सरकारने बजेटमध्ये १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांसाठीही मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे सरकारकडून निधी देण्यात हात आखडता घेतला जाणार नाही. येथील रस्त्यांसाठीही निधी देऊ. सात महिन्यात आम्ही कामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे आमच्यावर कितीही आरोप झाले तरी त्यांचे आम्ही कामातून उत्तरे देऊ,’ असेही त्यांनी सांगितले.
‘सरकार तुमच्या मनातील आहे, हे तुमचं सरकार आहे. मी कालही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. आम्ही राज्यात सण उत्सव आल्याबरोबर सुरू केले. या गोष्टीही आवश्यक आहे.’ असे स्पष्ट करत ‘ही कामे करण्यापासून आधीच्या सरकारला कुणी रोखले होते ?, त्यांचे हात कुणी बांधले होते ?’ असा सवाल शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘सरकार आपल्या पाठीशी आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. कारण हे डबल इंजिन सरकार आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत. म्हणून पंतप्रधानही दखल घेतात म्हणून ते येथे येतात. आधी का येत नव्हते माहिती नाही.’
एकनाथ शिंदे देवासारखे धावून आले – कांदे
ज्यावेळी मनमाड-करंजवण योजना (Manmad Karanjvan Scheme) करण्याचे ठरवले, सर्व पाठपुरावा केला, मात्र ज्यावेळी मान्यता मिळवण्याचा विषय आला. तेव्हा माजी मुख्यमंत्र्यांकडे 25 वेळा चकरा मारल्या, पण काम झालं नाही, शेवटी राज्यात सत्ता बदलली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योजेनेबद्दल सांगितले आणि त्यांनी एका क्षणात या योजनेला मंजुरी देऊन ते देवासारखे धावून आल्याचे मत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी व्यक्त केले. कांदे पुढे म्हणाले की, “स्वनिधी साठी माजी मुख्यमंत्र्याकडे 25 वेळा चकरा मारल्या. शेवटी वैतागून एक दिवस पत्र फाडलं, सगळं सोडून दिले. काही महिन्यांनंतर राज्यात शिंदे सरकार आले. त्यानंतर पाणीयोजना मंजूर करण्यात आली.