Download App

“फास्ट गाडीचाही अपघात होतो, क्रेडिट घ्यायचंच असेल तर..”, थोरातांनी सुजय विखेंना कोणता सल्ला दिला?

क्रेडिट घेत असाल तर फक्त संगमनेर तालुक्याचंच कशाला घेता. लाडकी बहीण योजना मीच आणली असं त्यांनी सांगितलं तर काय बिघडणार आहे.

Balasaheb Thorat Criticized Sujay Vikhe : ‘माझ्या पराभवाचं त्यांच्याकडून क्रेडिट घेतलं जातंय. पण, फक्त एकट्या संगमनेरचंच कशाला घेता? लाडकी बहीण योजना मीच आणली असं त्यांनी सांगितलं तर काय बिघडणार आहे? धर्माच्या नावाने जो खोटानाटा प्रचार केला त्यामागे सुद्धा मीच आहे, पैशांचा जो वापर झाला त्यामागेही मीच आहे असेही त्यांनी सांगावे. महाराष्ट्रात आमचा (काँग्रेस) जो पराभव झाला त्या सगळ्याचं क्रेडिट त्यांनी एकट्याने घेतल तर चांगलच आहे.’, असा खोचक सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे यांना दिला.

थोरात यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात राजकारणावर बेधडक मते व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे अमोल खताळ यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या मातब्बर नेत्याच्या पराभवाची राज्यात चर्चा झाली. थोरात यांचा पराभव करण्यासाठी विखेंची यंत्रणा काम करत होती असं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर पोरासोरांनीच तुमचा पराभव करुन दाखवला अशी खोचक टीका सुजय विखे पाटील यांनी थोरातांवर केली होती. याच अनुषंगाने एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी सुजय विखेंना खोचक सल्ला दिला.

तत्त्वांसाठी मरण्यासही तयार! संगमनेरच्या विराट मोर्चातून बाळासाहेब थोरातांची थरकाप उडवणारी घोषणा

नेमकं काय म्हणाले थोरात?

सुजय विखेंना तुमचा सल्ला काय राहील असे विचारले असता, ‘मी त्या दिवशीच सल्ला दिला होता की काळजी घेत चला. फक्त माझ्याच बाबतीत नाही तर कुणाच्याही बाबतीत बोलताना काळजी घेतली पाहिजे. आता कसं आहे सगळाच फास्ट कार्यक्रम आहे. पण फास्ट गाडीचा अपघात होतो. असं काही नाही. ते (सुजय विखे) माझ्या बाबतीत बोलतात. मी कसा त्यांचा पराभव केला असं सांगतात. पण त्यांचा तर पहिल्या टर्मनंतरच पराभव झाला मी तर आठ टर्म निवडून आलो आहे.’

‘क्रेडिट घेत असाल तर फक्त संगमनेर तालुक्याचंच कशाला घेता? लाडकी बहीण योजना मीच आणली असं त्यांनी सांगितलं तर काय बिघडणार आहे? धर्माच्या नावाने जो खोटानाटा प्रचार केला त्यामागे सुद्धा मीच आहे, पैशांचा जो वापर झाला त्यामागेही मीच आहे असेही त्यांनी सांगावे. महाराष्ट्रात आमचा (काँग्रेस) जो पराभव झाला त्या सगळ्याचं क्रेडिट त्यांनी एकट्याने घेतल तर चांगलच आहे.’

मी कधीही बाळासाहेब विखेंवर टीका केली नाही

‘बोलण्याची एक पद्धत असते. ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळी माझे सीनियर माझे वडील होते. खताळ पाटील होते. दत्ता देशमुख होते. बाळासाहेब विखे पाटीलही होते. सगळे नेते आमच्या जिल्ह्यात सीनियर होते. बाळासाहेब विखे आणि आमचा वादही होता. पण मी बाळासाहेब विखेंवर एक शब्दही कधी बोललेलो नाही. मी त्यांच्यावर बोलू नये असं माझं मत असायचं. तेच मत माझं अजूनही आहे की मी खालच्या पोरांवर बोलू नये. राधाकृष्ण विखे पाटील जर काही बोलले तर त्यावर मी उत्तर देणं शोभतं. एक पद्धत असते संस्कृती असते ती सगळ्यांनी जपली पाहिजे. त्यामुळे सुजय विखे जरी काही बोलले तरी त्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही.’ असे बाळासाहेब थोरात यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

follow us