Download App

“मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, लढणारच!” बाळासाहेब थोरातांनी आता ठरवलंच

पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.

Balasaheb Thorat : ‘आपल्याला सोबत राहून तालुका पुढे न्यायचाय आता चुकून चालणार नाही. हे लोकांना सांगा. मनावर घ्या. जर एवढं करुनही होणार नसेल तर आपल्याला लढाई करावीच लागणार आहे. जबरदस्त लढाई करू काही काळजी करू नका, मी भक्कम आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी भाऊसाहेब थोरातांचा मुलगा आहे. स्वातंत्र्यसैनिकाचा मी मुलगा आहे. रक्त ते आहे. आता मी असं म्हटल्यानंतर तुम्ही देखील भक्कम व्हायला हवं. चुका दुरुस्त करू. माझं काही चुकलं असल तर सांगा मी चांगलं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करील. तुम्ही सुद्धा तुमच्यातील चुका दुरुस्त करा. आपण एकत्रितपणे पुढे जाऊ’, हे शब्द आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे.

संगमनेर येथील स्नेहसंवाद मेळाव्यात बाळासाहेब थोरातांचं एक वेगळं रुप लोकांना पहायला मिळालं. पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

मोठी बातमी! संगमनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; बाळासाहेब थोरातांचा दारूण पराभव

थोरात पुढे म्हणाले, ‘आम्ही त्रासाला अन् धमक्यांना भीक घालणार नाही आम्ही लढणारच आहोत. आता तर काय दंड थोपटून कार्यक्रम चाललायं पाहा संगमनेरची जिरवली की नाही असं बोललं जात आहे. आम्हीही निवडणुकीत विजय मिळवला पण आता जे चाललं आहे ते दुर्देवी आहे. आमच्या अन् जनतेच्या गाफिलपणामुळे माझा पराभव झाला. हे सगंळं आम्ही दुरुस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. जनता ज्याच्या पाठिशी तोच समर्थ असतो. आपणच समर्थ राहणार आहोत घाबरायचं कारण नाही’, असा विश्वास थोरातांनी उपस्थितांना दिला.

‘एका ठिकाणी त्रास झाला तरी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. मी जे काही करतो ते चांगलंच करतो. राजकारणाचं फाऊंडेशन काँक्रीटचं आहे ते बिलकुल हललेलं नाही. त्याचे खांब प्रत्येक नागरिक आहेत. जनतेच्या ताकदीच्या जीवावर संकटांवर मात करणार आहे. गावांगावांमधले वाद आधी मिटवा. माझं व्यक्तिगत काहीही नुकसान होणार नाही’, असेही थोरात यावेळी म्हणाले.

ज्यांनी फटाके वाजवले, ते घरात माझ्या कष्टाचं पाणी पिलेत; थोरातांनी आठवण करुन दिली 

बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, नंतर घरात गेल्यावर त्यांनी पिलेलं पाणी हे आपल्या कष्टामुळेच आलंय, त्यांनी घराच जे खाल्ल असेल ते आम्ही मेहनत करुन आणलेल्या पाण्यावरच शिजवलयं. घासाबरोबर काही आठवणी काढा, थोडी तरी कृतज्ञता, संवदेना ठेवली पाहिजे. देशात लोकशाही आहे, लोकं इकडं तिकडं मते देऊ शकतात पण जे केलं ते मान्य करण्याची दानत ठेवली पाहिजे ती काही लोकांमध्ये दिसत नसल्याचा टोलाही बाळासाहेब थोरातांनी विरोधकांना लगावलायं.

follow us