Download App

नगर दक्षिण लोकसभेवरून महाविकास आघाडीत तिढा… काँग्रेस-राष्ट्रवादीचा दावा

Ahmednagar LokSabha Elections : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (LokSabha Election 2024) होणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्षांकडून प्रबळ उमेदवाराची देखील चाचपणी केली जात आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचेच नाव पुन्हा चर्चेत आहे, तर दुसरीकडे विखेंना तोडीस तोड असा उमेदवार दिला जाईल व नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच (शरद पवार गट) लढवणार असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी व्यक्त केले होता. तर दक्षिण लोकसभेची जागा कॉंग्रेस पक्ष लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभेच्या जागेवरून जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नगर दक्षिण लोकसभा यंदाच्या वर्षी चांगलीच गाजणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अनेक गणित बिघडली आहे. नगर दक्षिणमधून सध्या भाजपचे सुजय विखे हे विद्यमान खासदार आहे. तर या निवडणुकीमध्ये विखेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता नगर जिल्ह्याकडे पुन्हा एकदा शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे. यातच येत्या दोन दिवसांत होणाऱ्या शिर्डीमधील शिबिरामध्ये काही महत्वाचे निर्णय लोकसभेच्या जागेबाबत घेतले जाऊ शकतात.

नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच लढणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारी करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा लढवणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतेच दिली होती. तसेच शिर्डीमध्ये होणाऱ्या शिबिरामध्ये याबाबत देखील ज्येष्ठ नेते शरद पवार हे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे असे देखील तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान नगर लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी वाढू लागली आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याविरोधात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचेही नाव पुढे येत आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला: केवळ अंतिम शिक्कामोर्तब बाकी, सुप्रिया सुळे यांचा दावा

नगरच्या जागेवर काँग्रेसचाही दावा
अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभेची जागा कॉंग्रेस पक्ष लढविण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली. आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ओबीसींची संख्या जास्त असलेल्या मतदासंघात कॉंग्रेसने जागा लढवाव्यात अशी मागणी 2 महिन्यांपूर्वी केली होती व त्याचा सतत पाठपुरावा देखील केला आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात अस्तित्व टिकविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दृष्टिक्षकोनातून पक्षश्रेष्ठींनी देखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेस पक्षचं लढवील यावर पक्षश्रेष्ठी सुध्दा ठाम आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात ही जागा कॉंग्रेस पक्ष नक्कीच जिंकेल असा ठाम विश्वास असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

follow us

वेब स्टोरीज