अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. यावर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.
अशात आजच्या अहमदनगर दौऱ्यात खुर्ची नसलेल्य राम शिंदे यांना खुर्चीची व्यवस्था करुन बाजूला बसवत भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खास’ मेसेज दिला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “म्हणून तर दोघांना सोबत घेऊन बसलो ना. समन्वयचं आहे, काही काळजी करु नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही, चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपलेलंं आहे”, असेही त्यांनी सांगितले. (DCM Devendra Fadnavis Message to Radhakrishna Vikhe Patil on Ram Shinde issue)
https://www.youtube.com/watch?v=q6idKwctPBA
देवेंद्र फडणवीस अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी व्हीआयपी विश्रामगृहाचे भूमिपूजन केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत विखे पाटील यांच्यासह राम शिंदे आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार उपस्थित होते. बैठकीमध्ये व्यासपीठावर राम शिंदे यांना बसण्यासाठी खुर्चीच नव्हती. मात्र हा घोळ लक्षात आल्यानंतर तातडीने मंचावर खुर्चीची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे फडणवीस यांनी स्वतःच्या शेजारी शिंदे यांना बसवून घेतले. फडणवीस यांनी शिंदे यांना दिलेल्या या ‘खास’ ट्रिटमेंटमुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी विखे पाटील यांना ‘खास’ मेसेज दिल्याची चर्चा आहे.
विखे पाटील, राम शिंदे अन् मध्ये देवेंद्र फडणवीस….#letsuppmarathi #video #VikhePatil #RamShinde #DevendraFadnavis #BJP #NCP pic.twitter.com/I4i3R5S9tL
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 26, 2023
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. राम शिंदेंच्या आरोपात कोणतेही तत्थ नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखेंनी यांनी केला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांना एकत्र बसून वाद मिटवल्याचे सांगितले होते. एखाद्या विषयामध्ये मतमतांतर होऊ शकतं. त्याला संपूर्ण गटबाजी म्हणत नाही. स्थानिक पातळीवरील तो विषय आहे. मी तो पूर्णपणे सोडविला आहे. एवढा काही त्याच्यामध्ये बाऊ करुन घ्यायची गरज नाही, असं बावनकुळे यांनी सांगितले होते. यावर राम शिंदे यांनी आम्ही अजून एकत्र बसलो नाहीत. बोलवणार असतील असं वाटतं, असं म्हणतं थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाच खोट पाडलं. दरम्यान, आता पक्षातील अंतर्गत कलहाचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी जिल्ह्याचे प्रभारी असलेल्या फडणवीस यांना या वादावर तोडगा काढावा लागणार आहे.