AAP च्या एन्ट्रीने बिघडला खेळ! केजरीवाल-मोदी संघर्षात काँग्रेसचा सायलेन्स मोड
AAP : आम आदमी पक्षाचे प्रमुख (AAP) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विफल करण्याच्या उद्देशाने देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश आणला आहे. या अध्यादेशाला रोखण्यासाठी केजरीवाल विरोधकांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटी घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून (Congress) अद्याप कोणतीच भूमिका घेतल्याचे दिसून आलेले नाही.
तसे पाहिले तर आम आदमी पार्टी आता एक राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाने विविध राज्यांत आपली पकड मजबूत केली आहे. याचा सर्वाधिक परिणाम काँग्रेसवरच झाला आहे. पंजाब आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांव्यतिरिक्त गुजरात आणि गोव्यात आम आदमीच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसचे अस्तित्व प्रभावित झाले आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकांत आम आदमी पार्टीच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत.
Arvind Kejriwal Meet’s Sharad Pawar : दिल्लीकरांना वाचवण्यासाठी पवारांचा केजरीवालांचा कानमंत्र…
दिल्लीत केला काँग्रेसचा सुपडा साफ
दिल्लीचा विचार केला तर 2012 मध्ये आम आदमी पार्टीच्या स्थापनेनंतर आपने 2013 मध्ये पहिल्यांदा निवडणुका लढल्या. या निवडणुकीत पक्षाला 28 जागांवर यश मिळाले. काँग्रेस 8 तर भाजपला 32 जागा मिळाल्या. आकडेवारीवर नजर टाकली आपने निवडणूक लढल्यामुळे सर्वात जास्त फटका काँग्रेसलाच बसला. कारण, याआधी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 43 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या.
2013 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवळपास 35 जागा कमी झाल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या 32 जागा वाढल्या. त्यावेळी आप आणि काँग्रेस दोघांनी मिळून सरकार स्थापन केले होते. अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. पण काही काळानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
2015 आणि 202 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. 2015 मध्ये आपने 67 तर 2020 मध्ये 62 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला.
काँग्रेसच्या वादाचा फायदा घेत पंजाब जिंकलं
दिल्लीनंतर आपने पंजाबकडे मोर्चा वळवला. 2017 मध्ये पहिली निवडणूक पक्षाने लढविली आणि 20 जागा जिंकल्या. यावर्षी काँग्रेसने 77 जागा जिंकत सरकार स्थापन केले. पुढील निवडणुकांपर्यंत परिस्थिती पूर्ण बदलली होती. काँग्रेसच्या तब्बल 59 जागा कमी झाल्या तर आम आदमी पक्षाला 72 जागांची आघाडी मिळाली. या निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाने 92 जागा जिंकत सरकार बनवले. काँग्रेसला फक्त 18 जागा मिळाल्या.
Tamil Nadu : तामिळनाडूत ‘अमूल’वरुन वाद, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे अमित शाहांना पत्र
गोव्यातही काँग्रेसला दिला झटका
गोवा या लहानशा राज्यातही आम आदमी पार्टीचे दोन आमदार आहेत. मागील वर्षी या राज्यात निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 11 जागा मिळाल्या. आपने पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि 2 जागा जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला दोन जागांचा फटका बसला. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 11 जागा मिळाल्या होत्या तर 2022 मध्ये फक्त 9 जागा मिळाल्या.
गोव्याप्रमाणेच आपने गुजरात निवडणुकीतही नशीब आजमावले. येथे पक्षाला 5 जागा मिळाल्या. दुसरीकडे काँग्रेसच्या 60 जागा कमी झाल्या. आम आदमीच्या प्रवेशाचा भाजपाच्या स्थितीवर काहीच फरक पडला नाही. 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या 56 जागा मात्र वाढल्या आणि पक्षाने 156 जागांवर विजय मिळवला.