धुळे: किरकोळ वादातून सुरू झालेल्या प्रकरणातून जीवही जातो. धुळे जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यात झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला आहे. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातही घटन घडली आहे. ( Dhule News Three killed in stabbing )
सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या व्यक्ती साई गोसावी याचा खासगी रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर तिन्ही जखमींना धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे गुरुवारी दुपारी एक लग्न सोहळा होता. लग्न सोहळ्याच्या वेळी आलेल्या नातेवाइकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यावेळी एकमेकांवर थेट धारदार शस्त्राने वार केला.
त्यात सोनू गोसावी, देवेंद्र पवार, साई गोसावी हे गंभीर जखमी झाले. सोनू गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर साई गोसावी याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मारहाणीचे कारण समोर आले नसले तरी नातेवाइकांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यातून ही घटना झाल्याचे बोलले जात आहे.
