MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठे राजकारण सुरु आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे नेतेमंडळींसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यातच सरकारमध्ये नव्याने एंट्री झालेल्या राष्टवादीच्या काही नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देवदर्शनासाठी वैष्णवदेवीला रवाना झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्याला एखादे मंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच सध्या आमदार संग्राम जगताप यांच्यासह निलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. ( During Maharashtra Cabinet Expansion MLA Nilesh Lanke gone for Vaishnodevi )
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात एक मोठी घटना घडली होती. राष्ट्रवादीत बंडाची ठिणगी पडत अजित पवार यांनी आमदारांचा एक मोठा गट सोबत घेत थेट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्यासह काही आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकली. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेऊन तब्बल एक आठवडा उलटला असला तरी मंत्रिपदी विराजमान झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचे खाते वाटप हे काही झालेले नाही. तसेच उर्वरित खाते वाटप कधी होणार? कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार? याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.
‘तुमच्या फालतु कुटनितीमुळे लोक तुम्हाला कुटून खातील’; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आतुर आहेत. मात्र खातेवाटपावरून सुरु असलेल्या नाराजीनाट्यामुळे हा विस्तार रखडला असल्याने जाणकार सांगत आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (अजित पवार गट) अजून काही आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. यामध्ये अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या राजकीय उपलपालथी घडल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सध्या राज्यातील बड्या नेत्यांचे दिल्ली दौरे सुरु आहे. तर दुसरीकडे सत्तेत आलेल्या राज्यातील तीनही पक्षातील अनेक आमदारांनी मुंबईचा रस्ता धरलेला आहे. आपली वर्णी मंत्रीपदी लागावी यासाठी शक्तिप्रदर्शन देखील सुरु आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना मात्र दुसरीकडे नगरचे दोन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागले जाण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मात्र, याचवेळी आमदार निलेश लंके हे सध्या आपल्या मतदारसंघात देखील नाही व मुंबईत देखील नाही. आमदार लंके थेट पोहचले ते वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी. याबाबत आमदार लंकेचे विश्वासू कार्यकर्ते माजी सरपंच राहुल झावरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. निलेश लंके हे माता वैष्णोदेवीचे भक्त असून गेल्या अनेक वर्षांपासून ते दरवर्षी न चुकता वैष्णोदेवी दर्शनाला जात असतात. दरम्यान राज्यात जरी मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु असली तरी मात्र आमदार निलेश लंके हे सध्या आपल्या कार्यकर्त्यांसह वैष्णोदेवीच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी गेलेले आहेत.