पवार फक्त हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल; थोरातांच्या विधानाने अजितदादांचं टेन्शन वाढलं
Balasaheb Thorat On Ajit Pawar Rebel : अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. त्यानंतर आता शरद पवारांसमोर पुन्हा पक्षाला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले असून, पक्ष मजबुतीसाठी पवारांनी दंड थोपटले आहे. पवार केवळ महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिल आणि निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील असे मोठे विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते मुंबई तकच्या मुलाखतीत बोलत होते. थोरातांच्या या विधानाने मात्र अजितदादांचं टेन्शन वाढलं असल्याची चर्चा रंगली आहे.
वळसेंना मतदारसंघात जाऊन उत्तर देणार; आमदार रोहित पवार आक्रमक
अजित पवारांनी बंडखोरी करत 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकांचे सत्र पार पडले. यावेळच्या भाषणात अजितदादांनी त्यांच्या मनात असलेली अनेक वर्षांपासूनची खदखद बोलून दाखवली. त्यानंतर पवारांनी कराड गाठत पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर, छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून या दौऱ्याचा श्री गणेशा केला.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पक्षाला पुन्हा उभारी देऊ शकतील का? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता. मात्र, त्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी वरील विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, पवार फक्त हात जोडून जरी राज्यभर फिरले तरी त्याचा फायदा होऊन राष्ट्रवादी पुन्हा नव्या जोमाने उभी राहिल असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला आहे.
शिंदेंवर टीका करायचे पण फडणवीसांना.., दादांच्या बंडानंतर काँग्रेस नेत्याचा मोठं विधान…
पवारांनी स्वतंत्र राजकारण केले आहे
बंडखोरीनंतर पवारांनी काँग्रेससोबत हातमिळवणी करत राजकारण करण्याची अजिबात गरज नाही. कारण पवारांनी स्वतंत्रपणे राजकारण केले असून, त्यांचे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी नाही. आम्ही केवळ दोन वेगळे पक्ष आहोत हीच काय ती वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने सध्या वाटचाल सुरू आहे ती विजयासाठी योग्य असल्याचा विश्वासही यावेळी थोरातांनी व्यक्त केला आहे.
खाते वाटपावरून खलबतं सुरू
दुसरीकडे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. त्यानंतर अद्यापर्यंत खाते वाटप झालेले नाही. अजित पवार अर्थ खात्यासह अन्य काही महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून असल्याने अद्यापपर्यंत हा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता अजित पवारांनी मागणी केलेली खाती त्यांना मिळतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.