भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार आहे. (Rajysabha) 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारी दाखल करण्यास 5 मार्चपर्यंत मुदत आहे. भाजपनं त्यापूर्वी 9 राज्यांमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार आहेत.
पहिल्या यादीत भाजपने 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावं आहेत. बिहारमधून राज्यसभेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून 6 राज्यातील राज्यसभेच्या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बिहार, आसाम, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, पश्चिम बंगालमधील एकूण 9 जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6, बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रातून कोणाला संधी?
भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर कोणाला पाठवलं जाणार यासंदर्भात विविध नावं चर्चेत आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मागील आठवड्यात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यासंदर्भातील नावं सुचवण्यात आली होती. राज्यात विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप 3 जागा सहजपणे जिंकू शकतं. तर, चौथ्या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांची मदत लागेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक जागा निवडून येऊ शकते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका जागी उमेदवार दिला जाईल.
भाजपनं कोणाला उमेदवारी दिली?
बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार
आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन
छत्तीसगड :लक्ष्मी वर्मा
हरियाणा : संजय भाटिया
ओडिशा : मनमोहन सामल, सुजीत कुमार
पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा
