“आघाडीशी प्रामाणिक न राहणाऱ्यांनी आम्‍हाला पक्षनिष्‍ठा शिकवू नये”, विखेंचा थोरातांवर हल्लाबोल

महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्‍यांनी आम्‍हाला पक्षनिष्‍ठेच्‍या गोष्‍टी शिकवू नयेत.

Radhakrishna Vikhe

Radhakrishna Vikhe

Radhakrishna Vikhe Criticized Balasaheb Thorat : नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्‍या निवडणूकीत जे महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्‍यांनी आम्‍हाला पक्षनिष्‍ठेच्‍या गोष्‍टी शिकवू नयेत. ज्‍यांनी स्‍वत:च्‍या निष्‍ठाच सिल्‍व्हर ओक आणि मातोश्रीच्‍या चरणी अर्पण केल्‍या आहेत त्‍यांना तालुक्‍यातील जनतेप्रती निष्‍ठा राहिलेल्‍या नाहीत. ज्‍यांनी सहकारी संस्‍था काढून दिल्‍या त्‍यांची आठवणही न ठेवणारे जनतेला कधी विसरतील हे सांगता येत नाही. कोणताही विकास न करता हसून जिरविण्‍याचे काम करणाऱ्यांचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकल्‍याशिवाय राहणार नाही असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांना दिला.

आश्‍वी येथे आयोजित केलेल्‍या महायुतीच्‍या सभेमध्‍ये मंत्री विखे पाटील यांनी आ.थोरात यांच्‍या निष्‍क्रीय कार्यपद्धतीवर घणाघाती टीका केली. विखे म्हणाले, आमचे सरकारचे वाळू धोरण फसले म्हणणाऱ्यांचे माफीया फसले आहेत. आमचे वाळू धोरण चांगलेच आहे. या धोरणामुळे तुमची अडचण झाली आहे. हीच परि‍स्थिती त्‍यांच्‍या दूध संघाचीही झाली आहे. यांचा दूधसंघ एवढा चांगला आहे तर सरकारला अनुदान देण्‍याची वेळ का आली? असा सवाल विखेंनी केला.

महायुती सरकारचे सुमारे १० कोटी रुपयांचे अनुदान आम्‍ही राजहंस दूध संघाला दिले. यामध्‍ये आम्‍ही राजकीय अभिनिवेश ठेवला नाही. आम्हाला दूध धंदा कळत नाही असे म्‍हणणाऱ्यांनी एकदा महानंदामध्‍ये आपल्‍या जावयाने काय केले हे एकदा तपासून पाहा, तुमच्‍या अमृतवाहीनी बँकेची आवस्‍था कशी नाजूक झाली आहे हे आता सांगायला लावू नका अशा सूचक शब्दांत विखेंनी थोरातांना सुनावले.

शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुरी तालुक्यात झंझावाती दौरा

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी संगमनेर कारखाना उभारुन दिला. पहिल्‍या संचालक मंडळात तर भाऊसाहेब थोरात सुद्धा नव्‍हते. पण ज्‍यांनी कारखाना उभारणीत योगदान दिले त्‍यांची आठवणही यांनी ठेवली नाही. आज पद्मश्रींनी दाखविलेल्‍या मोठ्या मनामुळे तुम्‍हाला समृद्धी प्राप्‍त झाली आहे. सह्याद्री शिक्षण संस्‍थाही काढणाऱ्यांचा विसर आ. थोरातांना पडला हाच त्‍यांचा राजकीय दहशतवाद असल्‍याचा आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला.

सुसंस्‍कृत तालुका म्‍हणून मिरवून घेता आणि साईबाबांच्‍या दरबारात येवून धांदात खोटं बोलता. ३० हजार युवकांना रोजगार दिल्‍याचा दावा तुम्‍हाला तरी खरा वाटतो का असा प्रश्‍न उपस्थित करुन पक्षनिष्‍ठेच्‍या गोष्‍टी करणाऱ्या थोरातांनी नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीशी कशी गद्दारी केली याची आठवण विखेंनी उपस्थितांना करून दिली. रात्री तुम्‍ही कोणकोणत्‍या भाजप नेत्‍यांना भेटता हे आता मला बोलायला लावू नका असेही ना.विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

निळवंडे धरणाच्‍या बाबतीत तीस वर्ष लोकांची फसवणूक केली. अनेक वर्ष मंत्री राहिलात पण पहिल्‍या २० किलोमीटर अंतरावरील कामं तुम्‍हाला सुरु करता आली नाहीत. शरद पवार यांनी सुद्धा चार चार वेळा भूमीपूजन केले. तत्कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या पुढाकारामुळे कालव्‍यांची कामे झाली आणि पाणी आले हे पुण्‍य आम्‍ही करतो. जे ३५ वर्षांत झाले नाही ते आम्‍ही दोन वर्षात करुन दाखविले. उर्वरित कामासाठी केंद्राकडून ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

शिर्डीत जे.पी. नड्डांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटारसायकल रॅली; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचा शक्तिप्रदर्शन

आ. बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे प्रकल्पग्रस्‍तांच्‍या पुर्नवसनासाठी जमीन दिल्‍याचा वारंवार उल्‍लेख करतात पण या जमिनी पुन्‍हा जावयाच्‍या नावावर कशा झाल्‍या हे मंत्री विखे पाटील यांनी सभेतमध्‍ये ७/१२ उतारा दाखवून त्‍यांचा खोटेपणा उघड केला. मीही आता महसूल मंत्री आहे हे ते विसरुन गेले आहेत. त्‍यांचे असे अनेक उतारे माझ्याकडे आहेत असेही विखे पाटील म्हणाले.

Exit mobile version