धुळे : राष्ट्रवादीला राम-राम केलेले माजी आमदार अनिल गोटे हे भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे धुळ्याच्या जनतेचे डोळे लागले आहेत. गोटे यांनी तीन वेळा धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शेतकरी कामगार पक्ष, लोकसंग्राम हा स्वतःचा पक्ष , भाजप आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे. (Former MLA Anil Gote, who quit the NCP, will join the Bharat Rashtra Samithi)
गोटे यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे त्यांची घुसमट होत होती. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी जाहीर कार्यक्रमात पक्षांतर्गत गटबाजी बाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादीला रामराम ठोकत असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी शिवसेना (UBT) पक्षाकडून काही प्रस्ताव आल्यास विचार करू आणि आपण महाविकास आघाडी पक्षाचा घटक म्हणून भजपा विरोधात आपली भूमिका कायम ठेवू असे सांगितले होते.
शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून अनिल गोटे परिचित होते. पवार यांच्यावर अतिशय तिखट शब्दात टीका करत त्यांनी राष्ट्रवादीविरोधात प्रचार केला होता. मात्र 2019 मध्ये भाजपला कंटाळून त्यांनी शरद पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवदीत प्रवेश केला. तब्बल ३५ वर्षानंतर शरद पवार आणि अनिल गोटे एकत्र आले होते. मात्र त्याचवेळी गोटे शरद पवार यांच्यासोबत किती टिकतील हा चर्चेचा विषय होता. गोटे आल्यापासून धुळे राष्ट्रवादीत दोन गटात संघर्ष होत असल्याचे वारंवार दिसून आले होते. आता अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यानंतर आता अनिल गोटे हे भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खान्देशातील भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांच्याशी विळ्या-भोपळ्याचे वैर असल्याने ते पुन्हा भाजपमध्ये जातील यात शंका आहे. तर शिवसेना (UBT) ला धुळ्यात नाकापेक्षा मोती जड नको अशी अवस्था आहे. धुळ्यात अनिल गोटे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे गोटे वंचित किंवा भारत राष्ट्र समितीच्या पर्यायाचा विचार करु शकतात, असे बोलले जाते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत गोटे बीआरएसच्या व्यासपीठावर दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.