शेवगाव : बालमटाकळीचे ग्रामदैवत श्री बालंबिका देवी यात्रोत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. बालंबिका देवीच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. या भाविकांना मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेता यावा. यासाठी यंदाही मोफत सर्व रोग निदान महाशिबीर राबवण्यात येणार असल्याची माहिती व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन कृष्णा मसुरे यांनी दिली आहे.
हे महाशिबीर व्यंकटेश फाऊंडेशन, व्यंकटेश मल्टीस्टेट व सुरभी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, १५ जानेवारी रोजी, सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या सर्व रोग निदान शिबिरामध्ये पोटविकार, हृदयरोग, मेंदू व मणक्यांचा आजार, मधुमेह, अस्थिरोग आणि स्त्री-आरोग्य यांच्याशी संबंधित रोगांचे निदान करण्यात येणार आहे. यासाठी तज्ञ डाॅक्टरांची उपस्थिती या शिबीरात असणार आहे. तसेच, या महाशिबीरामध्ये अल्पदरात काही महत्वाचे स्कॅनही करण्यात येणार आहे. यामध्ये २डी इको, एन्डोस्कोपी, एक्स-रे, कोलोनोस्कोपी, फायब्रोस्कॅन (लिव्हर तपासणी), सिटी स्कॅन आणि पॅप्समियर (गर्भपिशवीच्या मुखाची कॅन्सर तपासणी) यांचा समावेश आहे.
याचबरोबर या महाशिबीरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरही घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व पद्धतीची तयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मसुरे यांनी दिली.
बालमटाकळीमध्ये दरवर्षी पौष पौर्णिमेपासून बालंबिका देवीची यात्रा तीन दिवस सुरू असते. श्री बालंबिका देवी ही माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप असून याविषयीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवरात्रोत्सव व पौष पौर्णिमेला देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती असते.