अहिल्यानगर : राज्यात गाजलेल्या केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप भानुदास कोतकर (Sandip Kotkar) यांचा दोषमुक्ती (Discharge) अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अहिल्यानगरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे यांनी मंगळवारी हा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Kedgaon Double Murder Case: Former Mayor Sandeep Kotkar’s Discharge Plea Rejected)
या चर्चित दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी संदीप कोतकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यानंतर सीआयडीने त्यांच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने आरोपीस जामीन मंजूर केला होता.
दोषारोप निश्चितीपूर्वी आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने गुन्हा घडला. त्यावेळी ते नाशिक कारागृहात असल्याने त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
मात्र, अभियोग पक्षाने या युक्तिवादास जोरदार विरोध करत तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उपलब्ध पुरावे आणि तपासातील नोंदींचा विचार करून न्यायालयाने आरोपीचा दोषमुक्ती अर्ज नामंजूर केला.
या प्रकरणात सरकारतर्फे अॅड. मंगेश दिवाणे यांनी प्रभावी बाजू मांडली. तसेच मूळ फिर्यादी संग्राम संजय कोतकर यांच्या वतीने अॅड. उमेशचंद्र यादव, अॅड. समीर पटेल आणि अॅड. सलमान जहागीरदार यांनी कामकाज पाहिले.
