अहमदनगरः अहमदनगर शहरातील सावेडी गाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. शहरात बिबट्याच्या संचाराची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शहरातील बालिकाश्रम रोड परिसर, पपिंग स्टेशन,बोल्हेगाव परिसरात एक बिबट्या संचार करत आहे. काही नागरिकांनी हा बिबट्या पाहिलं असल्याचं बोललं जातं आहे.
ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याबाबत सांगण्यात येत आहे.पोलिसांची एक व्हॅन शहरात पेट्रोलिंग करीत असून ‘नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, सतर्क राहून आपली काळजी घ्यावी हा संदेश नातेवाईक, मित्रांना द्यावा’, असं आवाहन करण्यात येत आहे. तसेच वनविभागाचे पथकही दाखल झाले आहे.
याआधीही अहमदनगर शहरालगत असणाऱ्या चांदबीबी महाल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी चांदबीबी महाल परिसरात बिबट्या पाहिलाही होता. त्यानंतर आता नगर शहरातच बिबट्याने प्रवेश केल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.
याबाबत व्याघ्र संरक्षण समितीचे सदस्य मंदार साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बालिकाश्रम रस्त्यावरील जुन्या पंपिंग स्टेशन रस्त्यावर उसाच्या क्षेत्रात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन नागरिकांना झालं आहे. उद्या प्रत्यक्ष पाहणी नंतर काय होते ते होईल स्पष्ट. नागरिकांनी तसेच या भागातील रहिवाशांनी उगाच घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.