Lok Sabha Election Utkarsha Rupvate increase tension of Lokhande and Vaghchaure : लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election ) प्रचार सुरु असून आता राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. शिर्डी ( Shirdi ) लोकसभा मतदार संघामध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. दुरंगी असलेल्या या लढतीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे. वंचितच्या उमेदवार असलेल्या उत्कर्षा रुपवते ( Utkarsha Rupvate) यांना जनमाणसातून मोठा पाठिंबा वाढतो आहे. विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात असलेली नाराजी पाहता याचा फायदा रुपवते यांना मिळणार असे चित्र सध्या शिर्डीत निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आरक्षित असलेल्या शिर्डी मतदार संघामध्ये यंदा तगडी फाईट होणार असे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर या मतदार संघामध्ये पुन्हा आपले स्थान भक्कम करण्यासाठी ठाकरेंनी नवी खेळी खेळली. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र अनेक पक्षांमधून फिरून आलेल्या वाकचौरेंना गद्दार म्हणत स्वपक्षातूनच विरोध वाढला.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते या स्वतः इच्छुक उमेदवार होत्या. मात्र हि जागा ठाकरे गटाला सुटल्याने रुपवते या नाराज झाल्या. त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या रुपवते यांचा जन माणसात चांगला दांडगा संपर्क आहे. गावपातळीवर आपली ओळख असलेल्या रुपवते यांनी काँग्रेसला राम राम ठोकत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करताच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना शिर्डीची उमेदवारी जाहीर केली. व दुरंगीअसलेल्या शिर्डी मतदार संघात तिरंगी लढत निर्माण झाली.
तत्पूर्वी शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेले सदाशिवराव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. मात्र मतदार संघामध्ये फारसा वावर नसल्याने त्यांच्या विरोधात कमालीची नाराजी पसरली होती. तसेच त्यांना देखील महायुतीच्या घटक पक्षातून विरोध झाला. जनसंपर्क नसलेले लोखंडे यांच्या विरोधात मतदार संघात नाराजी असल्याने त्यांच्या अडचणी देखील वाढल्या.
एकंदरीतच आजी माजी असलेल्या दोन्ही खासदारांवर शिर्डीकर कमालीचे नाराज आहे. यामुळे नवा पर्याय हवा अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे. एक सक्षम पर्याय हवा असे वातावरण निर्माण झाले असताना वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर झाली. वाकचौरे व लोखंडे यांच्यावर असलेली नाराजी पाहता रुपवते यांच्याकडे मतदार संघातील जनतेचा ओढा वाढला. रुपवते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताच अनेक संघटनांनी रुपवते यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली.
उमेदवारी अर्ज दाखल करताच रुपवते यांनी मतदार संघांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली. काँग्रेसमध्ये असताना गावपातळीवर काम केलेलं असल्याने मतदार संघामध्ये अल्पवधीतच त्यांची लोकप्रियता वाढू लागली. नागरिकांच्या भेटीगाठी घेत निवडणुकीबाबतचा जनकौल काय आहे याचा आढावा रुपवते घेऊ लागल्या आहे. राज्यात राजकीय पक्षांमध्ये झालेली फाटाफूट व आजी माजी खासदारांबाबत मतदार संघातील वाढती नाराजी आता त्यांना यंदाच्या निवडणुकीत अडचणीची ठरणार आहे. दुसरीकडे एका नवा सक्षम पर्याय म्हणून रुपवते यांची एंट्री झाल्याने विजयाचे वारे रुपवते यांच्या बाजूने वाहू लागले आहे असे चित्र सध्या शिर्डीमध्ये दिसते आहे.