Download App

सुजय विखेंचा विरोध अंगलट; नितीन भुतारे यांना मनसे जिल्हा सचिव पदावरून हटवले

Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन अजून महायुतीला जोडलं गेलेलं नाही. वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. मनसे महायुतीत कधीही सहभागी होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र ही घडी येण्याआधीच नगर शहरात (Ahmednagar News) राजकारणाचे काटे उलटे फिरले होते. पक्षाच्या वरिष्ठांच्या ही बाब लक्षात येताच संबंधित नेत्यांवर कारवाई करत हा वाद अधिक वाढू नये याची काळजी घेण्यात आली. महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना विरोध केल्याने मनसे पदाधिकारी नितीन भुतारे यांची हकालपट्टी करण्यात आली.

महायुतीचे उमेदवार असलेले भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात अपप्रचार केल्याप्रकरणी भुतारे यांच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. मनसेचे पदाधिकारी असलेले नितीन भुतारे यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरांमध्ये चांगलीच टीकाटिप्पणी केली होती. वेळोवेळी विखे यांच्याविरोधात त्यांच्याकडून वक्तव्य केले जात होती. राज्यात मनसे महायुतीत सहभागी होईल अशी दाट शक्यता असताना स्थानिक पातळीवर मात्र नेते विरोधी भूमिका घेत असतील तर हे बरोबर नाही असे वाटल्याने भुतारे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा

मनसेकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार नितीन भुतारे यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आपल्याला मनसे जिल्हा सचिव या पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे याबाबतचा आदेश नगर मनसेचे अध्यक्ष सचिन डफळे यांनी दिला आहे.

मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरात एका स्पर्धेचे आयोजन केले होते. यात सुजय विखे यांनी सर्वसामान्य नागरिकांना केलेले एक फोन रेकॉर्डिंग दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी स्पर्धा भुतारे यांनी भरवली होती. मात्र ही स्पर्धा त्यांच्या अंगलट आली असून थेट मनसेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवर नितीन भुतारे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. माझ्यावरील ही कारवाई मी माझे प्रमोशन समजतो, अशी खोचक प्रतिक्रिया नितीन भुतारे यांनी दिली.

Raj Thackeray : ‘इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढणार’ राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

 

follow us