Sujay Vikhe : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे फोटो कर्जतमध्ये एकाच बॅनरवर लागल्यानं नगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्ते फ्लेक्स बोर्ड लावतात. कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना असतात ते काही आम्हाला विचारून फ्लेक्स लावत नाही. एक काळ होता की माझा फोटो कुणी टाकत नव्हतं मात्र आपण या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे विखे म्हणाले. खासदार विखे एका कार्यक्रमानिमित्त नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना कर्जतमधील बॅनरबाबत प्रश्न विचारला. त्यावर विखे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली.
पवार-विखेंच वैर संपणार? रोहित पवार आणि सुजय विखेंचे फोटो झळकले एकाच बॅनरवर
विखे पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत फिरत होतो मात्र आता तेच आपल्यासोबत आले आहे. त्यामुळे राजकारणात या गोष्टी घडत असतात. हे नवं राजकारण असून मनामध्ये कटुता न ठेवता विकासाच्या दृष्टीने याकडे पाहिले पाहिजे. भाजपचा सदस्य या नात्याने भाजपचे आमदार राम शिंदे हे आमचे नेते असून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेवटी कार्यकर्त्यांच्या काही भावना असल्या तरी मात्र पक्षाचा जो काही प्रोटोकॉल आहे तो आम्ही पाळणार असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यातील खेड गावामध्ये एका बॅनरवर सुजय विखे आणि रोहित पवार यांची छायाचित्रे आहेत. रोहित पवार यांनी गावाच्या विकासासाठी 10 लाख, तर सुजय विखे पाटील यांनी 12 लाख दिले. त्यामुळे गावकऱ्यांनी या दोघांचे अभिनंदन करणारे फलक लावले आहेत. खरंतर राजकीय नेते हे विकासकामांच्या श्रेयवादावरून अनेकदा भांडतांना दिसतात. मात्र, सुजय विखे आणि रोहित पवार या दोन्ही युवा नेत्यांनी सामंजस्याने गावाच्या विकासासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्यात यावेळी लढाई इथं दिसली नाही. त्यामुळं आता पवार-विखे वादाचा अंक संपणार का, आणि हे दोन्ही नेते जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.