Sujay Vikhe : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील निशा लॉन्स येथे शनिवारी मेळावा घेत खासदार सुजय विखे यांनी आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
‘जिल्ह्याचे विचारवंत लोक काल आघाडीच्या मेळाव्यास होते. यांची वैचारिकता काय ?, जिल्ह्यासाठी हे काय करणार असं कोणीही बोललं नाही. अडीच कोटी रुपयांचा रस्ता पुणे महामार्गावरून बाजार समितीकडे जाण्यासाठी मंजूर केला. नगरची बाजार समिती राज्यात मोठी आणि प्रगतशील बाजार समिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची जाणीव असावी लागते. आम्हाला आज सत्ता मिळाली नाही, काही नेते काल आले आणि विकासाच्या गप्पा करायला लागले’, अशी टीका विखे यांनी लंकेंवर केली. यावेळी भाजप नेते पदाधिकारी उपस्थित होते.
विखे पुढे म्हणाले, ‘वाळूचे हप्ते बंद केल्याने यांची अक्कल बंद झाली. यांचे उलटे उद्योग बंद झाले. गुन्हेगारी प्रवृत्ती बंद झाली यामुळे हे लोक एक झाले. जिल्ह्यात सगळे गुन्हेगारी उद्योग करण्याचे काम आघाडीचे नेते करतात त्यांचा वेळीच बंदोबस्त केला जाईल. यासाठी सरकारी यंत्रणा काम करण्यास सज्ज आहे. आघाडीची भाषणं जर ऐकली तर बालिशपणाचे लक्षण, शेतकऱ्यांसाठी काय करणार, विकासाचा मुद्दा काय यावर त्यांना काही सुचले नाही.’
Sujay Vikhe : पोलीस प्रशासन कमी पडल्याने अहमदनगरमध्ये गुन्हेगारी वाढली
समिती वाचवायला आलेल्यांनी कारखानाच खाल्ला – कर्डिले
‘सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केलं नसत तर बाजार समितीची सत्ता मागेच गेली असती. बाजार समितीत खरे योगदान माजी सभापती भानुदास कोतकर यांचे आहे. त्यांनी बाजार समितीला वैभव प्राप्त करुन दिले. विकासाचे काम झाले तर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे हा आघाडीचा धंदा आहे. बाजार समितीने तालुक्यात पाच ठिकाणी कोरोना सेंटर चालवले, तुमची राज्यात सत्ता होती तुम्ही साधा बोअर तरी तालुक्यात घेतला का ?’, असा सवाल माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला.
‘टक्केवारी घेऊन आघाडीने काम केले. जनतेचे पैसे खाणारी मंडळी जिल्हा परिषद सोडत नाहीत हे फक्त टक्केवारी साठी. तीन वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एक वर्षात आणला’ असेही कर्डिले म्हणाले. ‘भाजपमध्ये टक्केवारीवर काम चालत नाही ते उद्योग आघाडीचे आहेत. बाजार समिती वाचवायला निघालेले कारखाना खाऊन बसले आणि शेतकऱ्यांची कळवळ्याची भाषा करता, मतदार तुमचा हिशोब नक्कीच चुकता करतील ही येणाऱ्या निवडणूकीत समजेल’, असा इशारा कर्डिले यांनी प्रा. शशिकांत गाडे यांना दिला.
हे सरकार मूकं, बहिरं, आंधळं: अंबादास दानवे कडाडले
‘आघाडीच्या उमेदवारांना दोन अंकी संख्या गाठू देणार नाही. आजची उपस्थिती हाच आपला निकाल’ असेही कर्डीले म्हणाले. ‘शेतकऱ्यांच्या मुलाला बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्याचा विचार करतो आहोत त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन घेऊ’, असे कर्डिले म्हणाले. ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले येणाऱ्या काळात कुठ असतील त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहू नये’, अशी टीका घनश्याम शेलार यांचे नाव न घेता कर्डिलेंनी केली.
यावेळी अक्षय कर्डिले, दिलीप भालसिंग, अभिलाष घिगे, रमेश भांबरे, दादाभाऊ चितळकर, दत्ता नारळे, अशोक कोकाटे, अनिल करांडे यांची भाषणे झाली. यावेळी अशोक झरेकर, राम पानमळकर, राम साबळे, संतोष म्हस्के, रेवण चोभे, विलास शिंदे, आनंद शेळके, बाजीराव गवारे, मनोज कोकाटे, भाऊसाहेब बोठे, अर्चना चौधरी तसेच नगर तालुक्यातील भाजपचे सेवा सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.