Download App

नगरच्या खराब रस्त्यांचा अजितदादांच्या ताफ्याला फटका; खड्डे चुकवत गाठली पाथर्डी

Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar) ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यांनी प्रवास करावा लागतो. आमदार-खासदारांनी उपोषणे केल्यानंतरही रस्त्यांचे भाग्य काही उजळत नाही, ही येथील परिस्थिती असून रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. आज याच खराब रस्त्यांचा फटका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यालाही बसला.

अजित पवार पाथर्डी येथे जाहीर सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांचा ताफा नगर-पाथर्डी (Nagar Pathardi Road) रस्त्याने चालला होता. मुळात हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच कालपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे अधिक धोकादायक ठरत आहे.

वाचा : Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!

या अशा खराब रस्त्यांवरून अजित पवार यांनाही प्रवास करावा लागला. रस्त्यातील खड्डे चुकवत त्यांना पाथर्डीला पोहोचावे लागले. विशेष म्हणजे, हा तोच रस्ता आहे ज्या रस्त्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. हे उपोषण अजित पवार यांच्याच मध्यस्थीने सुटले होते. असे असतानाही या रस्त्याचे काम अजूनही सुरू झाल्याचे दिसत नाही.

Ajit Pawar : सरकार झोपा काढत आहे का?, पेपर फुटीवरुन अजितदादा विधानसभेत संतापले

दरम्यान, नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती होतच नाही असेही नाही. दुरुस्ती होते मात्र काही दिवसांनंतर पुन्हा रस्ते उखडातात. खड्डे पडतात. त्यामुळे दुरुस्तीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्चही वाया जातो. अशा परिस्थितीत रस्त्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. फक्त नागरिकांनाच नाही तर या भागातील लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचे मंत्री यांनाही याच रस्त्याने प्रवास करावा लागतो.

 

Tags

follow us