Chitra Wagh : खासदार संजय राऊत यांनी पिडीतेचा फोटो ट्विट केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) घणाघाती टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, की ‘संजय राऊत यांनी पिडीत मुलीचा फोटो व्हायरल केला हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांनी जे ट्विट केले तेही धादांत खोटे आहे. आरोपी दुसऱ्याच दिवशी पकडले गेलेले असताना ते म्हणतात की आरोपी अजूनही फरारच आहेत. तेव्हा खोटं बोला पण, रेटून बोला हा सर्वज्ञानी संजय राऊत यांचा फंडा आहे. तुम्ही जे सांगताय ते सगळे खोटे आहे. असे असतानाही मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे असे म्हणता. हा, मुर्खपणा आहे संजय राऊत.’ अशा शब्दांत वाघ यांनी राऊतांना सुनावले. तसेच या प्रकरणात सरकारने तत्काळ राऊत यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
वाचा : संपाच्या आडून अजेंडा चालविणारे महाभाग कोण? आंदोलनातल्या ‘त्या’ व्हिडीओ वरून चित्रा वाघ आक्रमक
चित्रा वाघ यांनी आज नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, ‘सर्वज्ञानी थोडीशी तरी लाज वाटू द्या. तुम्ही जे लिहीले आहे ते धादांत खोटे ट्विट आहे. तुम्ही लिहीले की आरोपी अजून फरार आहेत. पण, आरोपी तर दुसऱ्याच दिवशी पकडले गेले आहेत. ज्यांनी कसूर केला त्या पोलिसांवरही कारवाई केली आहे. हा मुद्दा भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.’
‘पिडीत मुलीचा फोटो व्हायरल करणे गुन्हा आहे. त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली पाहिजे, तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी मी करते. कोणत्या अधिकारात तुम्ही हा फोटो व्हायरल केला ?,’ त्यामुळेच कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्याचे वाघ म्हणाल्या.
बार्शीत अत्याचार; संजय राऊतांकडून फडणवीस लक्ष्य, चित्रा वाघ-शेलारांचे प्रत्युत्तर
महिला आयोग फक्त आम्हालाच नोटीसा धाडायला आहे का ?
‘राऊत यांनी जे काही सांगितले तुम्ही ते राज्याची दिशाभूल करणारे आहे. आरोपी पकडलेले असताना तुम्ही म्हणता की आरोपी फरार आहेत. आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. महिला आयोगाच्या कानावर ही बातमी गेली की नाही ?, नोटीस पाठविण्याचे तरी धारिष्ट्य करणार आहे की नाही ?, का नोटीसा फक्त आम्हाला पाठविण्यासाठी आहेत ?’, असे सवाल त्यांनी राज्याच्या महिला आयोगाला यावेळी केले.