Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. या मुदतीत अनेक उमेदवार आणि बंडखोरांनी अर्ज मागे घेत राजकीय पक्षांचे टेन्शन कमी केले. पण काही जणांनी अर्ज कायम ठेवल्याने अनेक मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीची परीक्षा होणार आहे. या वेळच्या निवडणुकीत घराणेशाहीची छाप दिसत आहे. अनेक नेत्यांची मुले मुली, पत्नी, भाऊ निवडणुकीत उभे आहेत. काही जणांची तिसरी पिढी मैदानात आहे. तर काही ठिकाणी सख्ख्या भाऊ बहिणीत सामना होत आहे. नगर जिल्ह्यात तर कधी काळी मिनी मंत्रालय गाजविणारे अनेक दिग्गज निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात यंदा लक्षवेधी लढत होणार आहे. कारण येथे चौरंगी लढत आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. मोनिका राजळे यांनी झेडपी उपाध्यक्ष तर काकडे यांनी महिला बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम पाहिले आहे. आता या दोन्ही रणरागिणी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमनेसामने आल्या आहेत. या व्यतिरिक्त या मतदारसंघांत शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे तर माजी आमदार चंद्रशेखर घुले अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात यंदा मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपचे नेते विठ्ठलराव लंघे यांनी थेट मुंबई गाठत अनपेक्षितपणे शिंदे गटाची उमेदवारी मिळवली. जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला गेला. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार पक्षाकडून रिंगणात उडी घेतली आहे. शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे आधी भाजपात होते. सन 2014 मध्ये लंघे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांचा सामना विद्यमान आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी होणार आहे.
“मु्ख्यमंत्रिपदासाठी आमच्यात कोणतीच रस्सीखेच नाही कारण..”, फडणवीसांनी क्लिअरचं केलं
श्रीगोंदा मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. महायुतीत भाजपने आधी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते यांना तिकीट दिले होते. परंतु आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रतिभा पाचपुते यांनी माघार घेतली. त्यामुळे मुलगा विक्रमसिंह पाचपुते हेच आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत तिकीटही मिळवले.
ठाकरे गटाने हा मतदारसंघ हट्टाने शरद पवार गटाकडून सोडवून घेत येथे अनुराधा नागवडे यांना संधी दिली. अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषदेतही काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता असताना ऐनवेळी मतदारसंघच ठाकरे गटाकडे गेल्याने माजी आमदार राहुल जगताप यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे आता त्यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. राहुल जगताप आमदार होण्याआधी जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
श्रीगोंदा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचीही एन्ट्री झाली आहे. या मतदारसंघात आघाडीला तगडा उमेदवार मिळाला आहेत. वंचितने अण्णासाहेब शेलार यांना तिकीट दिले आहे. शेलार या भागातील मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच शेलार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षही होते. बेलवंडी गटातून निवडून येत त्यांनी मिनी मंत्रालयात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता.
सध्या राज्याच्या राजकारणात पारनेर विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाने खासदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांना तिकीट दिले आहे. राणी लंके या काही काळ जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना संधी दिली आहे. दाते यांच्याही राजकारणात मिनी मंत्रालयाचं योगदान राहिलं आहे. काशिनाथ दाते काही काळ जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन समितीचे सभापती राहिले आहेत. आता त्यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.
वॉकओव्हर की रणनीती.. भाजपाच्या निशाण्यावरुन हेमंत सोरेन गायब; कारण काय?
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही अपक्ष अर्ज भरला होता. मात्र त्यांनी आज अखेरच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतला. आणखी एक माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी मात्र अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक पंचरंगी होणार आहे. आता या मतदारसंघात राणी लंके, अजित पवार गटाचे काशिनाथ दाते, पारनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि माजी आमदार विजय औटी, संदेश कार्ले यांच्यात लढत होणार आहे.
अकोले मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार किरण लहामटे यांना पुन्हा संधी दिली आहे. आमदार होण्याआधी लहामटे भाजपमध्ये होते. भाजपचे झेडपी सदस्य होते. मागील निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ही संधी हेरून लहामटे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेत उमेदवारी मिळवली. निवडणुकीत त्यांनी दिग्गज नेते वैभव पिचड यांचा पराभव केला. आता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी वैभव पिचड पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत आमदार लहामटे यांच्याशी होणार आहे.