Ajit Pawar : कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही. आजवर पाठीशी उभा होतोच. पुढेही असाच उभा राहील अशी ग्वाही राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन अजित पवार यांनी कोपरगावकरांना केले. जास्त निधी देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो असा शब्द देवून आ. आशुतोष काळे यांना मंत्रिपद देण्याबाबत अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले. कोपरगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आशुतोष काळेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी व्यासपीठावर महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे, अशोक रोहमारे, राजेंद्र जाधव, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, अॅड. रवी बोरावके, पद्माकांत कुदळे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब कदम, रिपाई (अ)चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रहाणे, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, रिपाईचे तालुकाध्यक्ष अनिल रननवरे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर आदी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, आशुतोषच्या रूपाने कोपरगावला उच्चशिक्षित, विकासाचे व्हिजन असलेलं नेतृत्व मिळालं आहे. त्याने पाच वर्षात आपल्या कामाचा ठसा उमटविला असून त्याचा मला अभिमान आहे. परंतु मागील वेळी अवघ्या आठशे बावीस मतांनी निवडून दिले यावेळी त्याला ८५ हजार मतांनी निवडून द्या. कोपरगावची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सुटल्यामुळे कोल्हे परिवाराने निवडणुकीत थांबून घेत आशुतोषला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. कोल्हे कुटुंबाचे योग्य पुनर्वसन करण्याचा शब्द त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला असून मी देखील त्याबाबत पाठपुरावा करणार आहे.
कोपरगावमध्ये युतीधर्म पाळला जाणार; कोल्हे परिवाराचा आशुतोष काळे यांना पाठिंबा
आजवर मी नेहमीच कर्तबगार माणसाच्या पाठीशी उभा राहिलो आहे. माझ्या ओठात एक आणि पोटात एक हे मला कधी जमलेच नाही आणि जमणारही नाही. माझे बोलणे नेहमीच सडेतोड असते हे संपूर्ण राज्याच्या जनतेला माहीत आहे. आशुतोषने माझ्याकडे पोलीस स्टेशन इमारत, कर्मचारी वसाहतीसाठी निधी मागितला मी दिला. पाच नंबर साठवण तलावाची लोकवर्गणी माफ करून मागितली ती पण दिली.
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मागितला तो पण मी दिला. कारण या सर्व गोष्टी आशुतोषने जनतेसाठी मागितल्या. त्यामुळे आजपर्यंत माझ्याकडे जे जे मागितले ते ते आशुतोषला दिले आहे. त्याने मांडलेल्या विकासाच्या सर्व संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी यापुढील काळातही कोपरगावच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आशुतोषचे सर्वच हट्ट पूर्ण करीन. जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढीच जबाबदारी देखील मोठी राहील याची तयारी करून ठेवा असे सूचक वक्तव्य करून मंत्रिपद देण्याबाबत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले.
आशुतोष काळे म्हणाले, राजकारण निवडणुकीपुरतेच ही कर्मवीर शंकररावजी काळे यांची शिकवून घेऊन वाटचाल करीत असताना सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास साधला आहे. यापुढील काळात देखील साधणार आहे. २०१९ ला निवडून आल्यानंतर पहिले दोन वर्ष कोविड महामारी असल्यामुळे निधी मिळण्यास काहीसा उशीर झाला परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे यापुढील काळात विकासकामांचे फक्त लोकार्पण तसेच नवीन मंजूर करून आणलेल्या कामांचे भूमिपूजन करायचे आहे. मतदारसंघाची सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वच कालवे व चाऱ्यांच्या कामाला प्राधान्य देवून ज्या प्रमाणे जिरायती भागातील गावांसाठी उजनी उपसा जलसिंचन योजना राबविली त्या धर्तीवर पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना ओव्हर फ्लोचे पाणी मिळावे यासाठी उपसा जल सिंचन योजना राबविण्याचा मनोदय काळे यांनी व्यक्त केला.
पाणी योजनांसाठी सोलरपंप ते निळवंडे कालव्यांच्या कामाला गती; आशुतोष काळेंचे मतदारसंघासाठी व्हिजन
मतदारसंघातील केटीवेअरचे बॅरीकेट कम पुलाध्ये रुपांतर करून दळणवळणाला अधिक गती मिळवून द्यायची आहे. दक्षिण उत्तर एकच रस्ता असून नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी द्यावा. नवीन एमआयडीसी सुरू होत असून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी व उद्योग वाढविण्यासाठी मदत करून ४३३ एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारणीसाठी सहकार्य करावे. अशा अनेक मागण्या आ. आशुतोष काळे यांनी केली.
आम्ही कामाची माणसं आहोत. आशुतोषचे कोपरगाव मतदारसंघात काम खूप चांगले आहे आम्ही आपण जे काही करतो ते जनतेसाठी करतो. आशुतोषने पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारं पावसाचं पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८५ हजार कोटी निधीची गरज आहे. केंद्नात महायुतीचे सरकार त्याबाबत देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली असून राज्य सरकार काम करणार आहे परंतु केंद्राचा देखील निधी लागणार आहे. वेळप्रसंगी जागतिक बँक व जपानच्या जायको संस्थेचा देखील निधीची गरज भासणार आहे. त्यांनाही सांगितले असून ही कामे आम्ही करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.