Ahilyanagar Politics : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर शहरात आज ठाकरेंच्या शिवसेनेची अत्यंत वाताहत झाली आहे. लोकसभा निवडणुकीमधील निकालांनंतर महाविकास आघाडीमधील ठाकरे गट व काँग्रेसचे जे राजकीय वजन होते ते मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अक्षरशः पानिपत झाले. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपले पाऊले सत्ताधाऱ्यांच्या दिशेने वळविली.
याचेच परिणाम नगरमधील ठाकरेंचे अनेक शिलेदार जे विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात होते त्यांनी निकालांनंतर शिंदे गटाकडे आगेकूच केली. तर दुसरीकडे नगर शहरातील काँग्रेसला (Congress Party) देखील वाली राहिलेला नाही यामुळे आघाडीमधील या दोन पक्षांची नगर शहरात मोठी वाताहत झाल्याचे पाहायला मिळते आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसतो आहे. ठाकरेंची शिवसेना यातून पूर्णपणे खिळखिळी होताना दिसते आहे. कारण अनेक शिलेदारांनी येणाऱ्या काळातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. विशष म्हणजे आमदार खासदारांसह आता नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश घेत आहेत. नगर शहरावर शिवसेनेचा दीर्घकाळ प्रभाव राहिला. स्व. अनिल राठोड यांच्यानंतर शिवसेनेकडे एकमुखी नेतृत्व राहिले नाही. यातच विधानसभा निवडणुकीवेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य देखील समोर आले होते.
मोठी डील अन् बावनकुळे सुरेश धसांचे बॉस; संजय राऊतांनी दावे अन् गौप्यस्फोटांचा पेटारा उघडला
सत्ताधारी पक्षात असल्यास आपली कामे मार्गी लागतील असा विश्वास नव्याने प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे. यामुळे अनेकांनी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला तर काहीजण भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांना थांबवणारे कोणी नाही. वरिष्ठांबद्दलच असंतोष निर्माण झालेला असल्याने स्थानिक पदाधिकारीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. विशेष म्हणजे जे शिवसैनिक ठाकरेंची साथ देत आहेत त्यांची विचारपूस देखील वरिष्ठांकडून होत नसल्याने तेही द्विधा मनस्थितीत आहेत. यामुळे नगर शहरातील ठाकरे सेनेच्या वर्चस्व संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे किरण काळे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शहरात मोठे खिंडार पडलेले असताना काळे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने ते शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, काळे यांनी अद्याप पुढील निर्णय जाहीर केलेला नाही. थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान सुमारे साडेचार वर्षांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी काळेंच्या खांद्यावर शहर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोपविली होती. त्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आलेल्या नाना पटोले यांनी देखील काळे यांची फेरनिवड करत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. दरम्यान विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काळे यांना संधी मिळाली नाही मात्र तरी त्यांनी पक्षाची साथ दिली. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र काळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नगर शहारत काँग्रेसची देखील वाताहत झाल्याचे दिसते आहे. यामुळे आता थोरात काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी काय पाऊल उचलणार हे पाहणे देखील महत्वाचे आहे.