Download App

‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित

Sharad Pawar : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र उमेदवारीचं गणित सहज सोडवलं. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर मते व्यक्त केली. तसेच केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. परंतु अनेक इच्छुकांकडून तुमची देखील भेट घेतली जात आहे, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, आमच्या वाटाघाटीत नाशिकची जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. इच्छुक आहेत. माझ्याशी बोलतात त्यात काही गैर नाही. पण आम्ही त्यांना समजावून सांगू की आपण दिंडोरीची जागा लढवतोय आणि दुसऱ्या जागेवर आपले सहकारी मित्र आहेत.

भाजपाच्या आठ वर्षांच्या सत्ताकाळात 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात एक मुख्यमंत्री, एक माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षांच्या सरकारमधील 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी आमदारांचा समावेश आहे. यात एकही भाजप नेता नाही. भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांची चौकशी थांबवली. यावरून तपास यंत्रणांचा वापर केवळ विरोधी पक्षांच्या विरोधात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार

याउलट युपीए सरकारच्या काळात त्या सरकारमध्ये मी सुद्धा होतो. त्या काळात राजकीय हेतूने कारवाई केलेली नाही. 2004 ते 2014 या काळात भाजपाच्या फक्त तीन लोकांवर कारवाई करण्यात आली होती. याचा अर्थ आम्ही सत्तेत असताना विरोधकांवर सत्तेचा गैरवापर कधी केला नाही पण, मोदींच्या काळात मात्र 121 लोकांवर ईडीचे खटले भरण्यात आले. हा सत्तेचा गैरवापर आहे. आगामी निवडणुकीत आम्ही हा मुद्दा जनतेसमोर मांडणार आहोत, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

संजय राऊतांची पाठराखण 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात असं सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर मात्र शरद पवार यांनी संजय राऊतांची पाठराखण केली. संजय राऊत खोटं बोलतात हे त्यांचं (प्रकाश आंबेडकर) मत आहे असा काही आमचा अनुभव नाही, असे शरद पवार म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारी सोडवू 

जागावाटपाचा निर्णय अंतिम करण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठीच थांबलो आहोत. आमची इच्छा आहे की त्यांनी यावं. त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घेऊ. त्यावर कार्यवाही करण्याचीही आमची तयारी आहे. प्रकाश आंबेडकर नेहमी सांगतात की मोदींचं राज्य घालवायचं आहे त्यांच्या या विचारात आणि आमच्यात साम्य आहे. त्यामुळे जागावाटपात काही अडचणी असतील तर त्या सामंजस्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे.

मोठी बातमी! वेल्हे तालुक्याचं नाव आता ‘राजगड’! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय!

follow us